
आयर्लंड क्रिकेटसाठी रविवार (28 जून 2026) ऐतिहासिक राहिला आहे. टीम इंडियाविरुद्ध तीन सामन्यांच्या टी20 मालिकेतील दुसरा सामना रविवारी खेळला गेला. या सामन्यात आयर्लंडने टीम इंडियाचा पराभव केला आणि मालिकेवर 2-0 असा कब्ज करत मालिका जिंकण्याचा ऐतिहासिक पराक्रमक करत सर्वांनाच धक्का दिला. मात्र, या ऐतिहासिक मालिका विजयानंतर अवघ्या 24 तासांत संघाचे मुख्य प्रशिक्षक हेनरिक मलान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. कार्यकाळ संपण्यापूर्वीच तडकाफडकी पद सोडण्याचा निर्णय घेतल्याने उलटसुलट चर्चांना उधान आलं आहे.
हेनरिक मलान यांचा करार 2027 च्या सुरुवातीपर्यंत होता, मात्र त्यांनी कार्यकाळ संपण्यापूर्वीच तडकाफडकी पद सोडण्याचा निर्णय घेतल्याचे आयर्लंड क्रिकेट बोर्डाने जाहीर केले. 45 वर्षीय हेनरिक मलान यांच्या मार्गदर्शनाखाली आयर्लंड क्रिकेटने गेल्या 4 वर्षांत यशाची नवी शिखरे सर केली. 2022 मध्ये मुख्य प्रशिक्षकपदाची धुरा सांभाळणाऱ्या मलान यांच्या कार्यकाळात आयर्लंडने सलग तीनवेळा टी20 विश्वचषकासाठी पात्रता मिळवली. इतकेच नव्हे तर, आयर्लंडने आपल्या क्रिकेट इतिहासातील पहिले तीन कसोटी विजय देखील मलान यांच्याच प्रशिक्षणाखाली नोंदवले. हिंदुस्थान सारख्या बलाढ्य संघाला टी-20 मालिकेत धूळ चारणे ही त्यांच्या कारकिर्दीतील सर्वात मोठी आणि ऐतिहासिक कामगिरी ठरली.
आपल्या पदाचा राजीनामा देताना हेनरिक मलान भावुक झाले आणि त्यांनी आयर्लंड क्रिकेटसोबतच्या आठवणींना उजाळा दिला. मलान म्हणाले की, “या खेळाडू, कर्मचारी आणि आयरिश क्रिकेट समुदायासोबत काम करणे माझ्यासाठी खूप अभिमानास्पद होते. मैदान मारताना आम्ही मेलबर्नमध्ये इंग्लंडविरुद्धचा ऐतिहासिक विजय, अफगाणिस्तान आणि झिम्बाब्वेविरुद्धचे पहिले कसोटी विजय आणि आता हिंदुस्थानविरुद्धचा ऐतिहासिक मालिका विजय अशा अनेक आठवणी जोडल्या आहेत. जगातील सर्वोत्तम संघांना पराभूत करून टी-20 विश्वचषकासाठी थेट पात्र ठरण्याची आमची क्षमता ही आमची मोठी उपलब्धी आहे. माझ्या कुटुंबासाठी हा अनुभव अप्रतिम होता आणि आम्ही हा काळ नेहमीच लक्षात ठेऊ.” अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.


























































