
>> नीलेश कुलकर्णी
लोकसभेतील तिसरा मोठा पक्ष असलेल्या अखिलेश यादवांच्या समाजवादी पक्षावर आता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची वक्रदृष्टी असल्याचे बोलले जात आहे. समाजवादी पक्षाचे नेते व अखिलेश यांचे चुलते रामगोपाल यांनी मध्यंतरी शहा यांच्या हाती एक ‘पर्ची’ दिल्याचे माध्यमातून व्हायरल झाले. ही पर्ची म्हणजे बंडखोर खासदारांचीच यादी असल्याचा जावईशोध अनेकांनी लावायला सुरुवात केली आहे. उत्तर प्रदेशात भाजपविरोधात तीव्र असंतोष आहे. या पार्श्वभूमीवर समाजवाद्यांच्या फुटीचे स्वप्नरंजन रचले जात आहे.
मुलायमसिंग यादव हयात असताना समाजवादी पक्षात फूट पडली होती. त्यावेळी अखिलेश यांची पाठराखण रामगोपाल यादव यांनीच केली होती. या फुटीला शिवपाल यादव यांची महत्त्वाकांक्षा कारणीभूत ठरली होती. नंतरच्या काळात यादव कुटुंबातील ‘यादवी’ मिटली. अखिलेश यांचे नेतृत्व आता जवळपास सगळ्यांनीच मान्य केले आहे. 2024 च्या निवडणुकीत मोदींचा बहुमताजवळ जाणारा वारू रोखण्याचे काम महाराष्ट्र व उत्तर प्रदेशने केले होते. भाजपने 240 या संख्येवरच गटांगळ्या खाल्ल्या, त्या उत्तर प्रदेशातून समाजवादी पार्टीने केलेल्या चमकदार कामगिरीमुळे. ज्या अयोध्येच्या पवित्र् राममंदिराचा भाजपने निवडणूक प्रचारातील मुद्दा म्हणून वापर केला त्या अयोध्येतही भाजपला पराभवाचा सामना करावा लागला. विरोधी पक्षात असूनही अखिलेश यांचा पक्ष एकसंध आहे आणि उत्तर प्रदेशात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या कारभारामुळे जनतेत प्रचंड रोष आहे. या स्थितीत अखिलेश, काँग्रेस व मायावती हे तिहेरी समीकरण जुळून आले तर भाजपचा धुव्वा उडणार हे निश्चित. एकटे अखिलेश स्वबळावर लढले तरी भाजपसाठी ते आव्हानात्मक असणार आहे. देशाच्या पंतप्रधानपदाचा रस्ता हा लखनौमधून जातो, असे म्हणतात ते लोकसभेत या राज्यात असलेल्या संख्याबळामुळे. त्यामुळेच आतापासूनच विरोधी पक्षाला नामोहरम करणे, त्यांच्याबद्दल भ्रम निर्माण करणे, असे उद्योग भाजपच्या चाणक्यांनी सुरू केले आहेत. राममंदिराच्या निर्माणातील घोटाळ्यामुळे भाजपच्या हिंदुत्वाचा बुरखा टरटरा फाटला गेला आहे. या घोटाळ्याची व्याप्ती मोठी आहे व त्यात अनेक बडे लोक सामील असल्याचे बोलले जात आहे. अखिलेश यादवांनी हा घोटाळा उघडकीस आणल्यामुळे ते सध्या ‘स्वयंघोषित चाणक्यां’च्या ‘रडार’वर असणे स्वाभाविकच आहे. पण त्यामुळे समाजवादी पक्षात फूट पडेल ही शक्यता म्हणजे निव्वळ भ्रम मानावा लागेल.
कुरियन यांचा राजीनामा
मोदी सरकारमधले पशुपालन राज्यमंत्री जॉर्ज कुरियन यांनी राजीनामा दिला आहे. अर्थात त्यात आश्चर्य वगैरे वाटण्यासारखे काहीच नाही. कुरियन यांची राज्यसभेची मुदत संपली होती. पक्षाने त्यांना पुन्हा राज्यसभेची संधी दिली नाही. त्यामुळे राजीनामा देण्याशिवाय त्यांच्याकडे दुसरा कोणताही पर्याय नव्हता. कुरियन यांच्या मार्गानेच आता पंजाबमधील रवनीत सिंग बिट्टू यांनाही जावे लागेल. पण कुरियन यांचे मंत्रीपदावरून जाणे जसे मनोरंजक आहे त्याहून त्यांचे मंत्री होणे अधिक मनोरंजक होते. ऐंशीच्या दशकात भाजपात काम करण्याचा निर्णय एका ख्रिश्चन समाजातील युवकाने घेणे तसे ‘राजकीय आत्महत्या’ करण्यासारखेच होते. मात्र, जॉर्ज यांनी तो धाडसी निर्णय घेतला व सतत काम करत राहिले. केरळममध्ये भाजप सत्तेवर येणे म्हणजे मृगजळासारखेच. हे माहिती असूनही ते सातत्याने कार्यरत राहिले. नरेंद्र मोदींच्या प्रचारसभेत त्यांचे भाषांतरकार म्हणून त्यांनी चोख काम बजावले. 2024 मध्ये मोदींच्या शपथविधीचे रीतसर निमंत्रण जॉर्ज यांना आले. जॉर्ज दोन ड्रेस घेऊन दिल्लीच्या केरळम भवनात दाखल झाले. शपथविधी झाला की केरळमला परत जायचे हे ठरवून, त्याप्रमाणे त्यांनी विमान तिकीटही बुक केले होते. मात्र घडले ते विपरीतच! केरळम भवनाच्या लॉनमध्ये शपथविधीच्या पूर्वसंध्येला ते फेरफटका मारत असताना, त्यांना थेट राष्ट्रपती भवनातून फोन आला आणि उद्या सकाळी पंतप्रधानांसोबतच्या ब्रेकफास्टला उपस्थित राहण्याची सूचना देण्यात आली. या सूचनेने जॉर्ज सर्दच झाले. त्यांच्याकडे शपथविधीसाठी नीटसे कपडेही नव्हते. मात्र आहे त्या कपड्यानिशी जॉर्ज कुरियन यांनी केंद्रीय मंत्रीपदाची शपथ घेतली. केरळममधील निवडणुकीपर्यंत भाजपलाही त्यांची थोडीफार गरज होती. निवडणूक संपली आणि जॉर्ज यांची मंत्रीपदाची सद्दीही!
भाजपची विद्या भाजपला
देशभरात विरोधी पक्षाचे आमदार, खासदार फोडून ‘क्रॉस व्होटिंग’ करण्याची एक कुप्रथा भाजपने अमलात आणली आहे. मात्र गुरूची विद्या कधी तरी गुरूलाच भोवते म्हणतात, त्याप्रमाणे ज्या क्रॉस व्होटिंगलाच भाजप चाणक्यनीती समजायचा तीच तथाकथित चाणक्यनीती कर्नाटकात भाजपवर उलटली आहे. कर्नाटक विधान परिषद निवडणुकीत संयुक्त जनता दलाच्या गोविंदराजू यांच्या विरोधात मतदान करून भाजपच्या 11 आमदारांनी क्रॉस व्होटिंग करत काँग्रेसच्या पाचव्या उमेदवाराला निवडून आणले आहे. शिवकुमार कर्नाटकचे मुख्यमंत्री झाल्यानंतर भाजपच्या परतफेडीच्या राजकारणाला सुरुवात झाली आहे. कर्नाटकात एनडीएचे संख्याबळ 82 आहे. विधान परिषदेसाठी गुप्त बॅलेट पद्धतीने मतदान झाले. त्याचाच फायदा उचलत भाजपच्या अकरा जणांनी पक्षादेश झुगारत काँग्रेसचा हात हाती धरला. त्यामुळे भाजपवर मोठी नामुष्की ओढवली गेली आहे. देशभरात विरोधी पक्षांचे खासदार व आमदार फोडण्यात ‘पीएचडी’ प्राप्त झाल्यानंतर कर्नाटकात आणखी कुणी ‘दुसराच पीचएडीधारक’ सापडल्याने भाजप नेतृत्व संतप्त झाले. त्यांनी तातडीने प्रदेशाध्यक्ष व माजी मुख्यमंत्री येदियुरप्पांचे चिरंजीव विजयेंद्र यांना दिल्लीत बोलावून त्यांची चांगलीच झाडाझडती घेतली. विजयेंद्र यांना ‘ते फुटीर 11 कोण?’ याचा शोध घेण्यास सांगण्यात आले आहे. येदुयुरप्पा, सदानंद गौडा, जगदीश शेट्टर व बसवराज बोम्मई हे सगळे माजी मुख्यमंत्री भाजपचे आहेत व ते बेरोजगार आहेत. त्यांच्यात मोठे गटतट आहेत. या गटातटांत कधीकाळी कर्नाटकात एकदम मजबूत असणारी भाजप विभागली गेली आहे. या अंतर्गत वादावादीचा फटका विधान परिषद निवडणुकीत भाजपला बसला आहे. बघू यात दिल्लीने मोठय़ा भिंगाच्या चष्म्याने शोधावयास सांगितलेल्या भाजपमधल्या ‘11 गद्दारांचा’ शोध लागतो का ते!






























































