
>>योगेश मिश्र
युरोपियन देशांनी भारतातून निर्यात होणाऱ्या फळे-भाजीपाल्यावर निर्बंध आणले. आपण विश्वास ठेवणारे लोक आहोत. दुकानदाराने एकदा सांगितले की, सर्व काही शुद्ध आहे की आपण मानून टाकतो. हळदीचा पिवळेपणा एखाद्या कृत्रिम रंगामुळे आहे की नाही, याची आपल्याला चिंता नसते. पाकिटावर शुद्ध असे लिहिलेले असते, म्हणजे सर्व काही उत्तमच असणार. आपल्या पणजोबांच्या काळापासून हेच खाल्ले जात आहे. आपल्याला काही चिंता करण्याचे कारण नाही. चिंता असली तरी आपण काय करू शकतो? पर्यायांच्या अभावाची ही सक्ती आहे. म्हणून प्रारब्धाला दोष द्या आणि रस्त्याकडेला मिळणारे मोमो, चाऊमीन आणि चाट यांचा आस्वाद घेत राहा.
अलीकडेच एक बातमी वाचनात आली. एखाद्या कोपऱ्यात लहानशी छापून आली होती आणि तशीच विरूनही गेली. बातमी अशी होती की, युरोपियन युनियनने भारतातून जाणाऱ्या फळे, भाज्या आणि इतर अनेक खाद्यपदार्थांवर निर्बंध घातले आहेत. कारण त्यामध्ये जड धातू, कीटकनाशके आणि रासायनिक घटकांचे असे प्रमाण आढळले, जे कर्करोगास कारणीभूत ठरू शकते आणि म्हणूनच युरोपमध्ये निषिद्ध मानले जाते. याआधी जपाननेही याच कारणामुळे भारतातील आंबे स्वीकारण्यास नकार दिला होता.
आपल्या वस्तूंना, विशेषतः अन्नपदार्थांना, यापूर्वीही अनेकदा परदेशी बाजारपेठांनी नकार दिलेला आहे. त्यामुळे हा काही नवीन प्रकार नाही. म्हणूनच अशा बातम्या मोठय़ा मथळ्य़ांत झळकत नाहीत. वर्तमानपत्रात एखाद्या सूचनेप्रमाणे छापून येतात आणि दूरचित्रवाणीवर तर त्यांना स्थान मिळण्याची शक्यताच नसते. आश्चर्य वाटण्यासारखेही काही नाही. ही काही फार मोठी गोष्ट नाही. आपण तर सर्व काही खातो. हे जड धातू, कीटकनाशके, रासायनिक अवशेष वगैरे नेमके काय असते, हे आपल्याला ठाऊकही नसते. कुणी सांगितलेलेही नसते. आणि सांगण्याची गरज कुणाला वाटलेलीही नसते. देशात असंख्य समस्या डोक्यावर आहेत. पोटभर अन्न मिळाले तरी मोठी गोष्ट मानली जाते. धान्य, भाजीपाला आणि फळांमध्ये रसायने आहेत की नाहीत, याचा विचार कधीतरी फुरसत मिळाली तर करता येईल.
आपण विश्वास ठेवणारे लोक आहोत. दुकानदाराने एकदा सांगितले की सर्व काही शुद्ध आहे की आपण मानून टाकतो. युरोप-अमेरिकेतील लोक जरा जास्तच भित्रे असावेत. पैसा अधिक झाला की नखरेही वाढतात. त्यांना कोण समजावणार की 150 कोटी लोक शेतीतून येणारी प्रत्येक गोष्ट डोळे झाकून खातात. आपल्या वस्तूंवर बंदी घालणे ही नक्कीच एखादी कटकारस्थानाची बाब असावी. त्यांना आपला हेवाही वाटत असणार. आपल्या वस्तूंमध्ये काही दोष असता तर सरकारने आपल्याला सांगितले नसते का? सरकारने सांगितले नाही, म्हणजे सर्व काही अगदी शुद्ध आहे, एवढेच. फळे-भाज्या धुऊन घेतल्या की त्यांच्यावरील सर्व रासायनिक पापे धुऊन निघून जातात, असे आपण समजतो. दूध उकळले की ते स्वच्छ झाले, असे मानतो.
मसाल्यांच्या पाकिटावर शुद्ध असे लिहिलेले असते, म्हणून त्यावर विश्वास ठेवतो. कधीकाळी ‘रविवार असो की सोमवार, रोज खा अंडी’ असा सरकारी प्रचार झाला होता. त्यामुळे आजही आपण अंडय़ांमधून ताकद मिळवत आहोत. मात्र अंडय़ात नेमके काय आहे, हे जाणून घेण्याची गरज आपल्याला वाटत नाही.
आगीमध्ये तापवले आणि पाण्याने धुतले की सर्व काही निष्कलंक होते, अशी आपली धारणा आहे. खरेतर ते श्रीमंत परदेशी लोक मेहनत करायला तयार नसतात. तळून खाणार नाहीत, नीट धुणार नाहीत, सोलणार नाहीत; फक्त पुसून खातील आणि मग घाबरतील. संशोधन करून वेळ वाया घालवतील. आपण त्यांच्याकडून नव्हे, त्यांनी आपल्याकडून शिकायला हवे. खाण्यापिण्याच्या वस्तूंवर संशोधन करण्यात आपल्याला वेळ वाया घालवायचा नाही.
आपल्याकडे महानगरपालिका आहेत, अन्नसुरक्षा विभाग आहेत, अधिकारी-कर्मचाऱ्यांची मोठी यंत्रणा आहे. त्यांना सर्व काही ठाऊक असते. होळी-दिवाळीत मिठाई आणि खवा पकडण्याच्या बातम्या येतात. उर्वरित वर्षभरही ते काहीतरी करतच असतील. त्यांच्यावर आपला पूर्ण विश्वास आहे. आपले आंबे, केळी, पपई ही सर्व झाडावरच नैसर्गिकरीत्या पिकतात आणि तिथून थेट आपल्या भोजनाच्या ताटात येतात, असे आपण समजतो. आपणही दररोज एक सफरचंद खाऊन डॉक्टरला दूर ठेवण्याचा प्रयत्न करीत असतो. पण कसे कोण जाणे, आरोग्य मात्र दगा देते आणि डॉक्टर अधिकाधिक जवळ येत जातो. सफरचंदावर आपल्याला संशय नाही; दोष कदाचित मागील जन्माच्या कर्मांचा असावा.
आपण जगातील मधुमेहाची राजधानी का ठरत आहोत? कर्करोगाचे प्रमाण चौपट-दहापट वेगाने का वाढत आहे? श्वास का गुदमरतो आहे? मूत्रपिंडे का निकामी होत आहेत? हृदयविकार का वाढत आहेत? यावर फार विचार करू नका. हे सर्व प्रारब्ध आहे. पापांचे फळ आहे. एक रुपयात नोंदणी करा आणि रांगेत उभे राहा.
प्रत्येक पद्धतीचे, प्रत्येक शाखेचे डॉटर उपलब्ध आहेत. चिंता करू नका. आरोग्य विमा आहेच. सर्व खर्च भरून निघेल. तुम्ही फक्त खात राहा आणि श्वास घेत राहा. मोठय़ा लोकांशी स्वतःची तुलना करण्याची चूकही करू नका. ते आपल्यासारखे नाहीत की दुकानातून 5 किलो मोकळे पीठ घेतील, पिशवी घेऊन भाजी आणायला जातील, एखाद्या शुद्ध शाकाहारी भोजनालयात बसून शुद्ध तूप आणि शुद्ध मध खात राहतील. काळ्या धुराने भरलेल्या बस, टेम्पो आणि लोकलमधून प्रवास करत खोल श्वास घेतील. त्यांना देश चालवायचा असतो. आपल्याला रुग्णालयांच्या भेटवस्तू मिळवायच्या असतात. ते आपल्यासारखे नाहीत की जे मिळेल ते खातील. ते निवडक वस्तू घेतात. त्यांना कधी रुग्णालयांच्या रांगेत उभे पाहिले आहे का? सेवा करत करत थकले की ते जलउद्यानात उडय़ा मारत नाहीत किंवा एखाद्या खाऊगल्लीत जाऊन चाट खात नाहीत. ते स्वीडन किंवा स्वित्झर्लंडला जाऊन येतात. तेही आवश्यकच असते. ते आपल्यासारखे खिशात निर्जंतुकीकरण द्रव घेऊन फिरत नाहीत किंवा प्रत्येकाशी हस्तांदोलन करत नाहीत. दूरून नमस्कार करून काम भागवतात. त्यांचे प्रारब्धही उत्तमच असते. तुम्ही युरोपमध्ये जाऊन पाहा. तिथे भारतातून निर्यात होणारी फळे-भाज्या खा. ती आपल्याच देशातून आली आहेत, हे ओळखणेही कठीण जाईल. चवही आश्चर्यचकित करेल. तो सर्व निवडक, सर्वोत्तम दर्जाचा माल असतो. वेगळ्या पद्धतीने पिकवलेला, वेगळ्या पद्धतीने परिपक्व केलेला आणि वेगळ्या पद्धतीने प्रक्रिया केलेला. त्यामध्ये कर्करोगाचा धोका निर्माण करणारा किंचितसा घटकही नसतो. आणि चुकून कधीतरी काही आकडेवारी दिसली तर ती दुर्लक्षित करा.
दूरचित्रवाणीवरील अधिक महत्त्वाच्या चर्चांकडे लक्ष द्या. त्यांचा उपयोग अधिक होईल. आपल्या देशात 10 कोटी लोक मधुमेहाने ग्रस्त आहेत, 13 कोटी लोक त्याच्या उंबरठय़ावर उभे आहेत, 31 कोटी लोकांना उच्च रक्तदाब आहे, 25 कोटी लोक स्थूलतेशी झुंज देत आहेत, दरवर्षी 18 ते 20 लाख लोकांना मेंदूविकाराचा झटका येतो, कर्करोगग्रस्तांची संख्या 20 लाखांच्या पुढे पोहोचत आहे आणि वायुप्रदूषण लाखो लोकांचे प्राण घेत आहे? तरीही काळजीचे कारण नाही. रुग्णालये उघडली आहेत, वैद्यकीय महाविद्यालये सुरू होत आहेत, विमा योजना कार्यान्वित आहेत. आपल्याला काही चिंता करण्याचे कारण नाही. चिंता असली तरी आपण काय करू शकतो? पर्यायांच्या अभावाची ही सक्ती आहे. म्हणून आपण देवाच्या भरवशावर आहोत. सरकारच्या खैरातींची बरसात सुरूच आहे. आता आपणच स्वतःला आजारांपासून वाचवू शकलो नाही, तर त्यात दुसरे कोण काय करणार? म्हणून प्रारब्धाला दोष द्या आणि रस्त्याकडेला मिळणारे मोमो, चाऊमीन आणि चाट यांचा आस्वाद घेत राहा.
(लेखक ज्येष्ठ पत्रकार-विश्लेषक आहेत)


























































