व्हेनेझुएलात लागोपाठ दोन भूकंपामुळे हाहाकार, मृतांचा आकडा 10 हजारांपेक्षा अधिक असण्याची शक्यता

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

व्हेनेझुएलामध्ये झालेल्या दोन शक्तिशाली भूकंपांमुळे मोठ्या प्रमाणावर विध्वंसाची भीती निर्माण झाली आहे. राजधानी कॅराकससह अनेक भागांमध्ये इमारती कोसळल्याचे वृत्त समोर आले आहे, तर हजारो लोकांनी आपली घरे आणि कार्यालये सोडून रस्त्यावर धाव घेतली आहे. यूएसजीएसने (युनायटेड स्टेट्स जिओलॉजिकल सर्व्हे) मृतांचा आकडा 10 हजारांपेक्षा अधिक असू शकतो, असा इशारा दिला आहे.

व्हेनेझुएलामधील पहिला भूकंप हा 7.1 तीव्रतेचा होता आणि त्याचा केंद्रबिंदू व्हेनेझुएलाच्या कॅरिबियन किनाऱ्यावरील मोरोन भागाच्या पश्चिमेला होता. या भूकंपाची खोली अंदाजे 22 किलोमीटर नोंदवली गेली. त्यानंतर लगेचच, भूकंपाचा आणखी एक जोरदार धक्का जाणवला, ज्यामुळे सर्वत्र घबराट पसरली. एपीच्या अहवालानुसार, 7.2 आणि 7.5 तीव्रतेच्या भूकंपांनी संपूर्ण प्रदेश हादरला. सुमारे 1 हजार 700 किलोमीटर दूर असलेल्या ब्राझीलमधील ॲमेझोनाससारख्या शहरांनाही इमारती रिकाम्या कराव्या लागल्या.

भूकंपानंतर तीन तासांच्या आत राष्ट्राला संबोधित न केल्याबद्दल आणि त्या काळात झालेल्या जखमी किंवा मृतांची माहिती सरकारने न दिल्याबद्दल रॉड्रिग्ज यांच्यावर राजकारण्यांनी आणि व्हेनेझुएलाच्या नागरिकांनी टीका केली. असे वृत्त आज तक ने दिले आहे. यूएस जिओलॉजिकल सर्व्हे (USGS) ने सुरुवातीला भूकंपाची तीव्रता 7.1 असल्याचे सांगितले होते, परंतु नंतर ती सुधारून 7.2 केली. भूकंपाचा केंद्रबिंदू कॅराकसपासून सुमारे 168 किलोमीटर पश्चिमेला, कॅरिबियन किनाऱ्यावरील मोरोन या शहराच्या पश्चिमेला होता.

व्हेनेझुएलामध्ये झालेले हे भूकंप गेल्या शंभर वर्षांहून अधिक काळातील सर्वात शक्तिशाली भूकंपांपैकी होते. राजधानी कॅराकसमध्ये, नागरिक घाबरून इमारतींबाहेर पळू लागले होते. झालेल्या भीषण भूकंपामुळे अनेकांचे संसार रस्त्यावर आले. राजधानीच्या दोन भागांमध्ये झालेल्या या भूकंपामुळे मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्या ही वाढण्याची शक्यता आहे.