
मध्यपूर्वेतील तणाव सध्यातरी संपुष्टात येण्याची कोणतीही चिन्हे दिसत नाहीत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलेल्या एका धमकीनंतर आता इराणनेही जशास तसे उत्तर दिले आहे. इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी म्हटले आहे की, जर पुन्हा एकदा युद्ध सुरू झाले, तर इराण प्रत्युत्तर देण्यास अजिबात मागे हटणार नाही. यासोबतच जागतिक व्यापारासाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या होर्मुझच्या सामुद्रधुनीबाबतची व्यवस्था आता पूर्वीसारखी राहणार नसल्याचेही त्यांनी जाहीर केले आहे.
होर्मुझच्या सामुद्रधुनीबाबत मोठा निर्णय
अराघची यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे की, ४० दिवसांच्या भीषण युद्धानंतर संपूर्ण प्रदेशात मोठे धोरणात्मक बदल झाले आहेत. “गेल्या अनेक दशकांपासून होर्मुझचा मार्ग खुला राहिला आहे. इराण आणि ओमान या दोन्ही देशांनी सागरी वाहतुकीत कधीही अडथळा निर्माण केला नाही व नेहमीच सुरक्षेची काळजी घेतली. मात्र सध्याच्या युद्धाने सर्व काही बदलून टाकले आहे. आता होर्मुझमधून होणारी जहाजांची वाहतूक पूर्वीसारखी राहणार नाही आणि त्याचे व्यवस्थापनही बदलेल. या मुद्द्यांवर आमची ओमानसोबत चर्चा झाली असून ती पुढेही सुरू राहील,” असे अराघची यांनी म्हटले आहे/
‘हुशार असाल तर पुन्हा हल्ला करणार नाही’
इराणच्या धोरणांबद्दल बोलताना अराघची म्हणाले की, “आजकाल आणखी एका युद्धाची चर्चा सुरू आहे. युद्ध होवो किंवा न होवो, आमची धोरणे बदलणार नाहीत. जर कुणी हुशार असेल, तर तो इराणी जनतेवर पुन्हा लष्करी हल्ला करण्याचा विचार करणार नाही. त्यांनी (अमेरिका आणि इस्रायलने) यापूर्वी दोनदा प्रयत्न केले आहेत आणि त्याचे परिणाम काय होतात, हे त्यांनी पाहिले आहे. जर त्यांना पुन्हा एकदा प्रयत्न करायचा असेल, तर ती त्यांची मर्जी आहे; परंतु यावेळीही त्यांना मागील प्रयत्नांपेक्षा वेगळा कोणताही निकाल मिळणार नाही.”
























































