
>>राजेश चुरी<<
राज्याचे राजकीय सत्ताकेंद्र आणि प्रशासकीय मुख्यालय असलेल्या मंत्रालयात सध्या उंदरांनी प्रचंड धुडगूस घातला असून, केवळ उंदीरच नव्हे तर मांजरी आणि कुत्र्यांनीही तिथे घरोबा केला आहे. मंत्रालयाच्या प्रत्येक मजल्यावर उंदरांचा सुळसुळाट असून, नुकतेच पत्रकार कक्षातही एका उंदराने दिवसभर मुक्तसंचार करत चांगलाच गोंधळ घातला. वर्तमानपत्रांच्या फाईली, इंटरनेट कनेक्शनच्या वायर्स आणि मोबाईल चार्जिंग पाईंट्सवर हा उंदीर बिनधास्त फिरत होता. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून उंदीर पकडण्यासाठी वेळोवेळी उपाययोजना केल्या जात असल्या, तरी वाढत्या उपद्रवापुढे त्या अपुऱ्या पडत आहेत. या उंदरांमुळे केवळ विद्युत यंत्रणेलाच धोका निर्माण झालेला नाही, तर इंटरनेटच्या वायर्स, संगणक, तसेच गोपनीय फाईल्स आणि महत्त्वाची कागदपत्रे फस्त होण्याचा मोठा धोका निर्माण झाला आहे.
दुसरीकडे, मंत्रालयाच्या इमारतीत मांजरी आणि कुत्र्यांचाही मुक्तसंचार वाढला आहे. काही मांजरप्रेमींकडून या मांजरींना नियमितपणे कॅटफूड दिले जात असल्याने त्या गुबगुबीत झाल्या आहेत. परिणामी, आजूबाजूला फिरणाऱ्या उंदरांकडे या मांजरी ढुंकूनही पाहात नाहीत. तसेच, इमारतीच्या वातानुकूलित यंत्रणेमुळे येथील लाद्या थंडगार झाल्या असून, कडक उन्हाळ्यापासून बचाव करण्यासाठी भटके कुत्रेही या थंड लाद्यांवर निवांत लोळत पडलेले दिसून येतात. प्रशासकीय मुख्यालयातील या अनागोंदी कारभारामुळे आणि वाढत्या उपद्रवामुळे मंत्रालयाची सुरक्षा आणि महत्त्वाची कागदपत्रे धोक्यात आली असून, यावर तातडीने ठोस उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.
मंत्रालयात उंदरांचा प्रचंड धुडगूस; इंटरनेटच्या वायर्स, महत्त्वाच्या फाईल्स आणि विद्युत यंत्रणेला मोठा धोका
#mumbai https://t.co/GyloSmrNuT
— Saamana Online (@SaamanaOnline) October 26, 2026




























































