
>>साधना गोरे
पृथ्वीवर मानव जीवन सुरू होण्याच्या आधीपासून घोडा या प्राण्याचं अस्तित्व होतं, असं मानलं जातं. मात्र कुत्रा, उंट व गाय यांच्या मानाने घोडा बऱ्याच उशिरा माणसाळला. असं असलं तरी मानवाच्या उन्नतीशी घोडय़ाचं अगदी जवळचं नातं आहे. ज्या ठिकाणी मानवाची पावलं उमटली त्या ठिकाणी घोडय़ाच्या खुरांचा ठसा आढळला, असं जॉन ट्रॉटवूड मूर या अमेरिकी पत्रकाराने म्हटलं आहे. प्रवासासाठी, वाहतुकीसाठी आणि मुख्यत्वेकरून सैन्यात त्याला मानाचं स्थान मिळालं.
अनेक भारतीय भाषांमध्ये ‘घोडा’ या उच्चाराशी साम्य असलेले शब्द आहेत, पण या शब्दाचं मूळ द्राविड भाषेत असल्याचं कृ. पां. कुलकर्णी म्हणतात. ते पुढं असंही म्हणतात, ‘‘तेलुगूत ‘गिरी’, कानडीत ‘कुद्री’, तामीळमध्ये ‘कुटुरै’ असे शब्द आहेत. ‘घोट’ हा ऑस्ट्रिक शब्दही आहे. मूळ शब्द द्राविडी दिसतो. ‘घोटक’ हे त्याचे संस्कृतीकरण उत्तरकालीन आहे. त्यापासून सिद्ध होणारी संस्कृत रूपं म्हणजे घोट, घोटक. पालीमध्ये घोटको, घोडग, घोडअ, घोड अशी रूपं आहेत. बंगाली, ओडिया हिंदी, सिंधी या भाषांमध्ये ‘घोरा’(डा) असं रूप आहे; तर गुजरातीत ‘घोडो’, नेपाळीमध्ये ‘घोडा’ हे उच्चार आहेत.’’
घोडय़ाच्या आकृतीवरून, गतीवरून, उपयोगावरून व लक्षणेने हा शब्द अनेक वस्तूंसाठी वापरला जातो. बुद्धिबळाच्या खेळात ‘घोडा’ नावाचा मोहरा असतो. हा सर्व बाजूंनी दोन सरळ व एक आडवं (अडीच) घर जातो. या मोहऱ्याचा विशेष हा की, तो इतर मोहऱ्यांच्या डोक्यावरून उडून जातो, तशी गती इतर मोहऱ्यांना नसते. बंदुकीतील हातोडीच्या आकाराच्या चापाला घोडा म्हणतात. लहान मुलं दोन पायांत काठी घालून धावतात. या खेळात काठीला घोडा मानलं जातं. वस्त्रं किंवा इतर वस्तू अडकवण्यासाठी ठोकलेल्या खुंटय़ा, फळ्या ठोकण्यासाठी आधाराला लावलेले लोखंडी स्टँड यांनाही घोडा म्हटलं जातं. शरीर वाहून नेतात म्हणून पायांना लक्षणेने घोडा म्हटलं जातं. उदा. दोन पायांचा घोडा. हल्ली घोडय़ाऐवजी बसही म्हटलं जातं.
घोडेस्वार भरधाव जात असताना दुसऱ्याने आपला घोडा त्याच्या वाटेत आणला तर पहिल्याला थांबावं लागतं. यावरून एखाद्या कार्यात विघ्न, अडथळा आणणं, शत्रूच्या मार्गात आडवं येणं याला ‘घोडा आडवा घालणं’ म्हणतात. आता घोडय़ाची जागा गाडीने घेतली आहे, त्यामुळे या प्रयोगातील क्रियापद गाडीच्या बाबतीतही वापरलं जातं. घोडा कसा चालतो, पळतो हे बघण्यासाठी त्याला मैदानात न्यावं लागतं. ते मैदान जवळ असल्यावर लगेच परीक्षा होऊन निकाल कळू शकतो. म्हणून कसोटीची वेळ जवळ येणे या अर्थानं ‘घोडा मैदान जवळ असणं’ म्हटलं जातं. घाईघाईत येणं-जाणं करण्याला ‘घोडय़ावर बसून येणं’ म्हणतात.
प्रत्यक्ष फायदा काही न मिळता फक्त हिशेब लिहून ठेवणं किंवा पत्रव्यवहार करणं या अर्थाने ‘कागदी घोडे नाचवणं’ म्हणतात. माणसं साक्षर झाल्यामुळे ही वृत्ती आणखीच वाढलेली दिसते. इतरांच्या पूर्वी आपला कार्यभाग घाईघाईने साधून घेण्याला ‘आपलंच घोडं पुढं दामटणं’ म्हणतात. जलद प्रवासाचं साधन म्हणून पूर्वी घोडेच असत. त्यामुळे एखाद्याचे घोडे मारले तर त्याचं मोठे नुकसान होई. यावरून नुकसान करण्याला ‘घोडं मारणं’ म्हणण्याची पद्धत रूढ झाली.
‘घोडय़ाने पेंड खाणे’ हा एक प्रयोग आजही खूप केला जातो, पण या प्रयोगात ‘पेंड’ हा शब्द चुकीचा वापरला जातो. ‘पेण’ म्हणजे प्रवासातील टप्पा किंवा मुक्काम. लांबच्या प्रवासात विश्रांतीचे निरनिराळे टप्पे (पेणे) ठेवलेले असतात. असे टप्पे आले की, घोडे तिथं अडतात. म्हणजे तिथं पेण खातात.
‘घोडा मरे भारे, शिंगरू मरे येरझारे’ किंवा ‘घोडे मेले ओझ्याने व शिंगरू मेले हेलपाटय़ाने’ या म्हणींचा अर्थ असा की, शिंगरू हे आपल्या आईबरोबर (घोडी) हेलपाटे घालतं. त्यामुळे जितके घोडीचे चालण्याचे श्रम तितकेच शिंगराचे. मुख्य व्यक्तीबरोबर आनुषंगिक व्यक्तींची उगाच ओढाताण होते तेव्हा ही म्हण वापरली जाते. पूर्वी वरात घोडय़ावर बसून काढीत. त्यात मिरवणुकीच्या पुढे घोडे असते. ती निघून गेल्यावर घोडय़ाचे काय काम? यावरून ‘वरातीमागून घोडे’ हा शब्दप्रयोग वापरला जातो. एखादी गोष्ट करायची तेव्हा न करता वेळ निघून गेल्यावर करण्याचा प्रयत्न करणं या अर्थी ही म्हण वापरली जाते.
मोठय़ा चुकीला मराठीत ‘घोडचूक’ म्हणतात, पण यातील ‘घोड’ शब्दाचा आणि ‘घोडा’ या प्राण्याचा काही संबंध नाही. कानडीमध्ये ‘गुडग’ म्हणजे मोठा, लठ्ठ, बळकट. ‘घोड’ म्हणजे मोठा हा अर्थ ‘घोडकोस’, ‘घोडनवरा’ किंवा ‘घोडनवरी’ या शब्दांतही आहे. पण ‘घोडमात’ म्हणजे मोठी मात नव्हे, तर बुद्धिबळाच्या खेळात घोडय़ाने राजाला शह देणं.


























































