
पावसाळ्यात अनेकांना अपचन, गॅस, पोटफुगी आणि बद्धकोष्ठता यांसारख्या समस्या जाणवतात. अशा वेळी फायबर, जीवनसत्त्वे आणि अँटिऑक्सिडंट्सने समृद्ध फळांचा आहारात समावेश केल्यास पचनक्रिया सुधारण्यास मदत होते. जाणून घेऊया पावसाळ्यात उपलब्ध असलेल्या काही आरोग्यदायी फळांबद्दल.
आलूबुखार
जून ते ऑगस्टदरम्यान उपलब्ध होणारे आलूबुखार पचनासाठी अतिशय लाभदायक मानले जाते. यामध्ये डायटरी फायबर आणि सॉर्बिटॉल मुबलक प्रमाणात असते, जे आतड्यांची हालचाल सुरळीत ठेवण्यास मदत करते. बद्धकोष्ठतेचा त्रास असलेल्या व्यक्तींनी हे फळ आहारात समाविष्ट केल्यास फायदा होऊ शकतो. याशिवाय रोगप्रतिकारक शक्ती वाढवून मोसमी आजारांपासून संरक्षण करण्यासही हे फळ मदत करते.
पपई
पपई हे पचायला हलके आणि पचनासाठी अत्यंत उपयुक्त फळ मानले जाते. यामध्ये असलेले ‘पपेन’ हे एन्झाइम अन्नाचे पचन सुलभ करते. त्यामुळे अपचन, पोटफुगी आणि जडपणाची समस्या कमी होण्यास मदत मिळते. पावसाळ्यात पचनसंस्था निरोगी ठेवण्यासाठी पपईचा आहारात समावेश करणे फायदेशीर ठरू शकते.
जांभूळ
पावसाळ्याच्या सुरुवातीला मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होणारे जांभूळ फायबरचा उत्तम स्रोत मानले जाते. याच्या सेवनामुळे पचनक्रिया सुधारण्यास मदत होते आणि गॅस तसेच बद्धकोष्ठता यांसारख्या समस्या कमी होऊ शकतात. जांभुळात लोहाचे प्रमाणही चांगले असल्याने रक्तक्षयाचा धोका कमी करण्यास मदत मिळते. तसेच कमी ग्लायसेमिक इंडेक्समुळे मधुमेहींसाठीही हे फळ फायदेशीर ठरते.
पेरू
पेरूमध्ये भरपूर प्रमाणात फायबर आणि व्हिटॅमिन सी आढळते. विशेष म्हणजे संत्र्यापेक्षाही पेरूमध्ये अधिक व्हिटॅमिन सी असते. त्यामुळे पचनक्रिया सुधारण्याबरोबरच रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यास आणि त्वचेचे आरोग्य जपण्यासही मदत होते. नियमित पेरू खाल्ल्यास पोट साफ राहण्यास मदत मिळू शकते.
नाशपती
नाशपती हे फायबरने समृद्ध असे फळ असून बद्धकोष्ठतेच्या समस्येवर नैसर्गिक उपाय मानले जाते. सकाळी रिकाम्या पोटी नाशपती खाल्ल्यास पचनक्रिया सुधारण्यास मदत होऊ शकते. यातील पोषक घटक आतड्यांचे आरोग्य चांगले ठेवण्यास उपयुक्त ठरतात.



























































