खासदार संजय दिना पाटील यांनी पत्रकारांची जाहीर माफी मागावी, मुंबई मराठी पत्रकार संघाची मागणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
mumbai-marathi-patrakar-sangh-demands-public-apology-from-mp-sanjay-dina-patil

नुकतेच शिंदे गटात प्रवेश केलेल्या गद्दार खासदार संजय दिना पाटील यांनी पत्रकारांबाबत वापरलेल्या आक्षेपार्ह, अवमानकारक आणि असंसदीय भाषेचा मुंबई मराठी पत्रकार संघ तीव्र निषेध केला आहे. तसेच खासदार संजय दिना पाटील यांनी आपल्या वक्तव्याबद्दल त्वरित जाहीर माफी मागावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

‘माझे काय करायचे ते करा, समोर पोलीस आहेत, कमिशनरकडे तक्रार करा,’ अशा प्रकारची दमदाटीची भाषा पत्रकारांना उद्देशून वापरणे हे लोकप्रतिनिधींना अजिबात शोभणारे नाही. पत्रकार म्हणून आपले कर्तव्य बजावणाऱ्या माध्यम प्रतिनिधींशी अशा पद्धतीने बोलणे हे केवळ पत्रकारांचा अपमान नसून लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाचाही अवमान असल्याचे मुंबई मराठी पत्रकार संघाच्या पत्रकात म्हटले आहे.

लोकप्रतिनिधींनी पत्रकारांच्या प्रश्नांना संयमाने आणि जबाबदारीने उत्तरे देणे अपेक्षित असते. पत्रकारांना धमकावण्याचा किंवा त्यांची अवहेलना करण्याचा कोणालाही अधिकार नाही. अशा प्रकारच्या वक्तव्यांमुळे प्रसारमाध्यमांच्या स्वातंत्र्याबाबत चुकीचा संदेश समाजात जातो, असेही पत्रकार संघाच्या पत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे.

मुंबई मराठी पत्रकार संघाच्या वतीने खासदार संजय दिना पाटील यांनी आपल्या वक्तव्याबद्दल त्वरित जाहीर माफी मागावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

दरम्यान, ठाणे पत्रकार संघाने देखील ठाणे महानगर पालिकेच्या समोर या घटनेचा निषेध नोंदवला आहे. संजय पाटील हाय हाय, संजय पाटील यांचा धिक्कार असो, अशा घोषणाही पत्रकारांनी यावेळी दिल्या.

पत्रकारांना काय बोलले खासदार संजय दिना पाटील?

गद्दार खासदार संजय दिना पाटील यांनी गुरुवारी पत्रकारांना दमदाटी करत शिवीगाळ केली आहे. यावेळी त्यांनी पत्रकारांना जीवे मारण्याची देखील धमकी दिली होती. ‘इज्जत देतोय इज्जतीत रहा. आता माझ्याकडे प्रतिक्रिया घ्यायला येऊ नका, नाहीतर मारून पाठवणार. हे सगळं रेकॉर्ड करा आणि कमिश्नरला पाठवा. पुन्हा विचारलात तर मार खाल. पोलिसांसमोर सांगतोय. यापुढे तुम्हाला इथे उभं नाही करणार’, अशी धमकी संजय दिना पाटील यांनी दिली.