
यावल तालुक्यातील किनगाव येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून विजयादशमीच्या पार्श्वभूमीवर रविवारी काढण्यात आलेल्या पथसंचलनाला गालबोट लागले आहे. रविवारी मशिदीसमोरून पथसंचलन जात असताना पोलिसांवर दगडफेकची घटना घडली. यावेळी पोलिसांनी लाठीमार केला. यात ३ ते ४ पोलीस जखमी झाले असून पोलिसांनी २० जणांना ताब्यात घेतले आहे.
किनगाव येथे रविवारी आरएसएसचे पथसंचलन होते. सकाळी ७ वाजता निघणाऱ्या या पथसंचलनास मशिदीसमोरून जात असताना ही घटना घडली. यावेळी सकाळी सात वाजेपासून किनगाव गावातील संपूर्ण दुकाने बंद ठेवण्यात आली होती. संपूर्ण जळगाव जिल्ह्यातून पोलीस फौजफाटा या ठिकाणी बोलावण्यात आला होता. पथसंचलनानंतर बंदोबस्तासाठी उपस्थित असलेल्या पोलिसांवरही दगडफेक झाली. त्यावर पोलिसांनी सौम्य लाठीमार करून जमावाला पांगवले. यात पोलीस कर्मचारी पुरुषोत्तम पाटील हे जखमी झाले आहेत. गावात सध्या चोख पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे.
दगडफेक करणाऱ्यांना ताब्यात घेण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. या घटनेनंतर परिसरात कोणत्याही प्रकारच्या अफवा पसरू नयेत, यासाठी पोलिसांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. समाजमाध्यमांवरील अप्रमाणित माहितीवर विश्वास ठेवू नये, तसेच शांतता राखण्यासाठी पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.




























































