
टी-20 सामन्यातील दणदणीत विजयाची मालिका हिंदुस्थानी महिलांनी एकदिवसीय मालिकेतही कायम ठेवली. प्रतिका रावलने शतकी पुनरागमन करताना शफाली वर्माच्या साथीने झिम्बाब्वेचे 198 धावांचे आव्हान 27.1 षटकांत गाठले आणि पाहुण्यांचा पुन्हा एकदा धुव्वा उडवला.
प्रतिकाचे शतक, शफालीचे झंझावात
198 धावांचा पाठलाग करताना स्मृती मानधना आणि प्रतिका रावल यांनी पहिल्या विकेटसाठी 94 धावांची भागीदारी केली. स्मृतीने 32 धावा करत संघाला वेगवान सुरुवात करून दिली. तिची विकेट पडल्यानंतरही हिंदुस्थानच्या धावगतीवर परिणाम झाला नाही. प्रतिका रावलने 96 चेंडूंत 15 चौकारांसह नाबाद 100 धावा ठोकल्या. दुसऱया बाजूला शफाली वर्माने अवघ्या 33 चेंडूंत पाच चौकार आणि चार षटकारांसह नाबाद 64 धावा कुटल्या. या दोघींनी दुसऱया विकेटसाठी नाबाद 106 धावांची भागीदारी करत विजयावर शिक्कामोर्तब केले.
श्री चरणी झिम्बाब्वे झुकली
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱया झिम्बाब्वेच्या संघाला हिंदुस्थानी गोलंदाजांनी मोठी धावसंख्या उभारू दिली नाही. श्री चरणीच्या भेदक फिरकीने चार विकेट घेत झिम्बाब्वेच्या फलंदाजीला अक्षरशा झुकवले. तिला क्रांती गौडने तीन, तर दीप्ती शर्माने दोन विकेट घेत साथ दिली. झिम्बाब्वेकडून बिलव्ड बिझाने 92 चेंडूंत 62 धावांची झुंजार खेळी केली. मात्र, इतर फलंदाजांना मोठी खेळी उभारता आली नाही.




























































