
जम्मू-कश्मीरमधील बांदीपोरा जिह्यात बंदी असलेली संघटना इत्तेहाद-उल-मुस्लीमनशी संबंध असल्याच्या आरोपावरून पोलिसांनी 6 जणांना अटक केली आहे. यामध्ये चार महिलांचा समावेश असून या नेटवर्कला सीमेपलीकडून निधी मिळत होता, असा पोलिसांना संशय आहे.
अटक करण्यात आलेल्या व्यक्तींची ओळख मुबीना बानो, वहीद अहमद भट, खुशबू जान, महक जान, आलिया जान आणि इरफान अहमद रेशी ऊर्फ रईस अशी झाली आहे. या नेटवर्कच्या बांदीपोरा आणि जवळपासच्या भागात 14 ते 15 गुप्त बैठका झाल्या होत्या. यापैकी 5 ते 6 बैठका या बांदीपोरा-बारामुल्ला मार्गावरील एका छोटय़ाशा हॉटेलमध्ये झाल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी केलेल्या तपासात 7 ते 8 लाख रुपयांचा संशयास्पद व्यवहार झाल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणात पोलिसांनी यूएपीएच्या कलम 10 आणि 13 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
























































