तुमचं नाव अदानी असतं तर एका रात्रीत रस्ते चांगले झाले असते! आदित्य ठाकरे पुन्हा हिंजवडीत… सरकारवर साधला निशाणा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी हिंजवडीतील वाहतूक काsंडी, रस्त्यांची दुरवस्था आदी समस्यांवरून सरकारवर आज निशाणा साधला. मुख्यमंत्री सातत्याने म्हणतात की, सरकारचे हिंजवडीवर विशेष लक्ष आहे. हे विशेष लक्ष म्हणजे विशेष दुर्लक्ष म्हणायचे का? असा सवाल करतानाच, हिंजवडीकरांचे नाव अदानी असते तर एका रात्रीत रस्ते चांगले झाले असते, असा टोला त्यांनी लगावला.

आदित्य ठाकरे यांनी 18 ऑगस्ट रोजी हिंजवडी परिसराचा दौरा करून तेथील रस्त्यांच्या दुरवस्थेची व वाहतूक काsंडीची प्रत्यक्ष पाहणी केली होती. तसेच तेथील नागरिक आणि आयटी कर्मचाऱयांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेत त्या प्रशासनासमोर मांडल्या होत्या. त्यावर प्रशासनाने गेल्या दोन महिन्यांत काय कार्यवाही केली, नागरिकांना दिलेल्या आश्वासनांची पूर्तता झाली का? हे जाणून घेण्यासाठी आदित्य ठाकरे यांनी आज पुन्हा हिंजवडीचा दौरा केला. हिंजवडी आयटी पार्कमध्ये आयटी कर्मचारी, हाऊसिंग सोसायटीधारक यांच्यासमवेत बैठक घेऊन सद्य परिस्थिती जाणून घेतली. त्यानंतर पत्रकार परिषद घेत आपली भूमिका मांडताना राज्य सरकार आणि मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर जोरदार हल्ला चढवला.

केवळ निधी नको, कामांची अंमलबजावणी करा

हिंजवडीतील आयटी सेक्टरच्या परिसरातील हाऊसिंग सोसायटय़ांमध्ये रस्त्यांची सोय नाही, कचरा उचलला जात नाही, पाणीपुरवठा होत नाही, वॉटर टँकर माफियांचा प्रश्न अशा विविध समस्या भेडसावत आहेत. या समस्या सोडविण्यासाठी कुठेही भेदभाव न करता मुख्यमंत्र्यांनी स्वतः तोडगा काढणे गरजेचे आहे, असे आदित्य ठाकरे म्हणाले. मुख्यमंत्री फडणवीस यांनी हिंजवडीतील विकासकामांसाठी 426 कोटी रुपयांचा निधी जाहीर केला. मात्र प्रत्यक्षात कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही, असा आरोपही आदित्य ठाकरे यांनी केला.

मुख्यमंत्री महाराष्ट्राचे वाळवंट करताहेत

भीमाशंकर आणि कर्जत येथे सुरू असलेल्या वृक्षतोडीवरूनही आदित्य ठाकरे यांनी यावेळी सरकारवर टीकास्त्र सोडले. उद्योगपती अदानी आणि बिल्डरांच्या फायद्यासाठी सर्वत्र झाडांची कत्तल सुरू असून मुख्यमंत्री फडणवीस महाराष्ट्राचे वाळवंट करत आहेत, असा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला. भीमाशंकर परिसरात नवीन झाडे लावण्याचे आश्वासन दिले जाते. मात्र ही झाडे लावणार कुठे आणि आतापर्यंत किती झाडे लावली? असा सवाल आदित्य ठाकरे यांनी केला.  

डेटा सेंटर रेड झोनमध्ये न्या!

ठाणे येथे मध्यभागी एआय डेटा सेंटर आणले जात आहे. यात वीज आणि पाणी प्रचंड लागते. आधीच पाण्याची कमतरता असताना हे सेंटर कशासाठी उभारले जात आहे. यातून किती जॉब क्रिएशन होणार आहे, किती रोजगार निर्मिती होणार आहे ? असा सवाल करीत हे डेटा सेंटर एमआयडीसीतील रेड झोनमध्ये उभारू शकता, याकडेही आदित्य ठाकरे यांनी लक्ष वेधले.

मेट्रोसाठी पंतप्रधानांची वाट का पाहताय?

जुलैपासून येथील मेट्रो सुरू होण्याच्या तारखा ऐकतोय. आता 3 नोव्हेंबरची तारीख सांगितली जातेय. पण मेट्रो सुरू होण्याचे नाव घेत नाही. जे काही राजकीय श्रेय घ्यायचे आहे ते घ्या. बॅनरबाजी करा. मात्र मेट्रो सुरू करण्यासाठी पंतप्रधानांच्या तारखांची वाट कशाला पाहता? आधी मेट्रो सुरू करा आणि नंतर उद्घाटन करा, असा सल्ला आदित्य ठाकरे यांनी सरकारला दिला.