पाच जिल्ह्यांतील हजारो भूमिपुत्र नागपूरच्या विधिमंडळावर धडकणार, नवी मुंबई विमानतळाला दिबांचे नाव कधी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि.बा. पाटील यांचे नाव कधी देणार, असा संतप्त सवाल उपस्थित करून भूमिपुत्र नागपूरच्या विधिमंडळावर धडकणार आहेत. विमानतळाला दिबांचे नाव देण्यास सरकारकडून दिरंगाई होत असल्याने जासई येथे आज पुढील आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी बैठक पार पडली. या बैठकीला रायगड, ठाणे, पालघर, मुंबई आणि मुंबई उपनगर, या पाच जिल्ह्यांतील भूमिपुत्र मोठ्या संख्येने उपस्थित होते.

केंद्र आणि राज्य सरकारने नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव देण्याचे आश्वासन पाळले नाही. जंतरमंतरवरील आंदोलनानंतरही सरकारची भूमिका ठरली नाही. यामुळे सरकारने विश्वासघात केला असल्याची संतापाची भावना भूमिपुत्रांमध्ये तयार झाली आहे. त्यामुळे आजची बैठक बोलवण्यात आली होती. चलो जासईचा नारा आणि उठ भूमिपुत्रा जागा हो, या संघर्षाचा धागा हो, अशी हाक देत भूमिपुत्र मोठ्या संख्येने या बैठकीत सहभागी झाले. या बैठकीला लोकनेते दि.बा. पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरण सर्वपक्षीय कृती समितीचे अध्यक्ष दशरथ पाटील, पाच जिल्ह्यांतील विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.