हत्येतील तिसरा चाकू दहिसर मोरी गावात सापडला, आरोपींचे रक्ताने माखलेले कपडे, मोबाईल, हेल्मेटचा मात्र अजून शोध नाही

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिवसेनेचे मानपाडा विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांची हत्या करण्यासाठी वापरण्यात आलेला तिसरा चाकू दहिसर मोरी गावात सापडला आहे. त्यामुळे हत्याकांडासाठी वापरण्यात आलेले एकूण तीनही चाकू तसेच पिस्तूल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे. दरम्यान, मारेकऱ्यांचे रक्ताने माखलेले कपडे, मोबाईल तसेच हेल्मेटचा अजूनही शोध लागला नसल्याने आरोपींच्या पोलीस कोठडीत वाढ करावी, अशी मागणी पोलिसांनी केली होती. मात्र न्यायालयाने आरोपी संतोष कनोजिया ऊर्फ टल्ली व अमित सिंग ऊर्फ पलू यांना न्यायालयीन कोठडी सुनावून त्यांची रवानगी तळोजा कारागृहात केली. कर्नाळा अभयारण्य परिसरातून यापूर्वी दोन चॉपर दोन पिस्तूल हस्तगत करण्यात आले होते. मात्र त्यासाठी वापरण्यात आलेला तिसरा चॉपर सापडला नव्हता. अखेर शुक्रवारी रात्री एसआयटीच्या पथकाने शीळ-डायघर परिसरातील दहिसरमोरी येथील झाडाझुडपांमध्ये सर्च ऑपरेशन राबवून तिसरा चॉपर हस्तगत केला. त्यामुळे हत्येसाठी वापरण्यात आलेली सर्व शस्त्रास्त्रे सापडली असून आता आरोपींचे रक्ताने माखलेले कपडे, मोबाईल व हेल्मेटचा शोल लावण्याचे आव्हान पोलिसांपुढे आहे.

आता मुख्यमंत्र्यांना पुरावे देऊ !
हत्याकांडाला २६ दिवस झाले तरी केसमध्ये कोणतीच प्रगती झालेली नाही. पोलीस फक्त टाईमपास करत आहेत. १३ सीसी टीव्ही फुटेज पोलिसांना दिले. त्यात मास्टरमाइंड कोण आहे याची माहिती आहे. मात्र त्यानंतरही त्यांना अटक झाली नाही. ते खुलेआम फिरत आहेत. यामुळे आता सर्व पुरावे ठाणे पोलिसांना नाही तर थेट मुख्यमंत्र्यांनाच देऊ, असा इशारा प्रदीप पूर्णेकर यांचे पुत्र राम पूर्णेकर यांनी दिला आहे. त्यांनी आज पुन्हा मीनाक्षी शिंदे आणि राजेंद्र शिंदे यांच्या अटकेची मागणी केली. आणखी एक सीसी टीव्हीचे फुटेज दाखवत पांढऱ्या रंगाची इनोव्हा पप्या शिंदेची असल्याचे सांगितले. सकाळी ८.१० ते ८.४० पर्यंत आरोपी मीनाक्षी शिंदेंच्या घराजवळ फिरत होते, असा दावाही त्यांनी केला आहे. तसेच एसआयटीच्या प्रमुखपदी आयपीएस दर्जाचा अधिकारी असणे गरजेचे होते. पण येथे नेमकं कोण आहे हेच कळत नाही. एसीपी शेखर बागडे यांच्यावर मोठे आरोप आहेत. अजित पवार यांनी बागडे यांची एसीबी चौकशी करण्याची मागणी केली होती, अशी माहितीही राम पूर्णेकर यांनी देऊन एकूणच तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

ठाणे पोलीस नेमके कोणाला वाचवताहेत, हर्षवर्धन सपकाळ यांचा सवाल
प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्याकांडाचा तपास करण्यासाठी स्थापन केलेली एसआयटी ही केवळ धूळफेक आहे. आतापर्यंतचा त्यांचा तपास पाहता पोलीस नेमके कोणाला वाचवताहेत, असा सवाल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे. हत्येमागे नेमकी कोणती शक्ती आहे, हे चौकशीतून समोर यावे, असे जर सरकारला वाटत असेल तर ठाण्याबाहेरील आयपीएस अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली एसआयटी गठीत करावी व हत्येचा संपूर्ण तपास उच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली करावा, अशी मागणीही हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे. सपकाळ यांनी आज ठाण्यात पूर्णेकर कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. पूर्णेकर कुटुंबियांनी आतापर्यंत अनेक पुरावे दिले. परंतु ज्यांची नावे संशयित म्हणून घेण्यात आली आहेत त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा आरोपही सकपाळ यांनी केला.