
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांची हकालपट्टी करण्यात यावी, या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीने आज मेट्रो सिनेमा ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मार्गावर पदयात्रा काढली. मेट्रो सिनेमा येथे काही वेळ रास्ता रोकोही करण्यात आला. पदयात्रेच्या शेवटी सभा झाली. देशात पारदर्शक पद्धतीने निवडणुका झाल्या तरच लोकशाही टिकेल. ज्ञानेश कुमार यांच्या विरोधातील आंदोलन जोपर्यंत राजकीय पक्ष चालवत आहेत, तोपर्यंत ते लोकशाहीच्या चौकटीत राहील. जनता आता काठय़ांचा उपयोग झेंडय़ासाठी करते आहे, मात्र ज्ञानेश कुमार यांना न हटवल्यास याच काठय़ा सत्ताधाऱयांवर पडतील, असा इशारा वंचितचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी दिला.



























































