
माळशेजमध्ये अदानींच्या दीड हजार मेगावॅट प्रकल्पामुळे 79 गावे उद्ध्वस्त होणार असल्याने काँग्रेसने या प्रकल्पाला विरोध केला आहे. सह्याद्रीच्या कुशीत असा विनाशकारी प्रकल्प होऊ देणार नाही, असा इशारा काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी दिला आहे.
विजय वडेट्टीवार यांनी सोशल मीडियावरून भाजप सरकारवर टीका केली आहे. भीमाशंकर डोंगर, मुंबईतील मोक्याच्या मौल्यवान जमिनी आणि देशाची प्रमुख समुद्री बंदरे असे सगळे ‘अदानीं’ना विकून या देशात भयानक एकाधिकारशाही आणली जात आहे. आता त्यांची वक्रदृष्टी थेट माळशेज घाटातील गावांवर पडली आहे. अदानींच्या 1500 मेगावॅट प्रकल्पासाठी या सरकारने मुरबाड व जुन्नरमधील 79 गावे उद्ध्वस्त करण्याचा घाट घातला आहे! भोरांडे, अजनावळे, घाटघर या भागातील गावकऱयांना अंधारात ठेवून, दडपशाहीच्या जोरावर डोंगर आणि गरीब आदिवासींच्या जमिनी गुजरातच्या उद्योगपतींच्या घशात घालण्याचे हे अतिशय घातक पाप हे सरकार करत आहे, असे वडेट्टीवार यांनी म्हटले आहे.
उद्योगपतींचे गुलाम बनलेले लाचार भाजप सरकार आज जमिनी लुटत आहे, उद्या देश विकायलाही हे मागे-पुढे पाहणार नाहीत. पेसा आणि वनाधिकार कायदा पायदळी तुडवून, 1,500 पानांचा अहवाल इंग्रजीत दडपून ठेवत सरकार आदिवासी भूमिपुत्रांना बेघर करत आहे. सह्याद्रीचे डोंगर आणि धबधबे ओरबाडून अदानींचे खिसे भरणे हाच सरकारचा ‘विकास’ आहे का, असा सवालही वडेट्टीवार यांनी केला.



























































