
मुंबई महापालिका कर्मचाऱयांना 33 हजार दिवाळी बोनस जाहीर झाल्यानंतर आता बेस्ट उपक्रमातील कर्मचारी-अधिकाऱयांचे बोनसच्या घोषणेकडे लक्ष लागले आहे. ‘मुंबईकरांची दुसरी जीवनवाहिनी’ म्हणून प्रवासी सेवा देणाऱया बेस्ट उपक्रमाच्या कर्मचाऱयांनाही पालिका कर्मचाऱयांप्रमाणेच दिवाळी बोनस म्हणून 33 हजार रुपये रक्कम देण्यात यावी, अशी मागणी शिवसेनाप्रणीत बेस्ट कामगार सेनेने प्रशासनाकडे केली आहे.
बेस्ट उपक्रमातील सर्व कर्मचारी-अधिकारी यांना आर्थिक वर्ष 2025-2026 साठी दिवाळी सणापूर्वी बोनस/सानुग्रह अनुदान मंजूर करुन प्रदान करण्याची मागणी बेस्ट कामगार सेनेने अलीकडेच केली आहे. संघटनेचे सरचिटणीस नितीन नांदगावकर, प्रमुख मार्गदर्शक गौरीशंकर खोत, व्यवस्थापकीय उपाध्यक्ष उमेश सारंग या प्रमुख पदाधिकाऱयांनी बोनसच्या मागणीकडे बेस्ट प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. संघटनेतर्फे बेस्ट समिती अध्यक्षा तृष्णा विश्वासराव यांना निवेदन देण्यात आले आहे. याचदरम्यान महापालिका कर्मचाऱयांना 33 हजार रुपयांचा दिवाळी बोनस जाहीर झाल्याने बेस्ट उपक्रमातील अधिकारी-कर्मचाऱयांनाही वेळीच बोनसची रक्कम मंजूर करून प्रदान करण्यात यावी, अशी मागणी बेस्ट कामगार सेनेतर्फे करण्यात आली.


























































