
अहिल्यानगर शहरातून वाहणाऱ्या सीना नदीच्या पूरनियंत्रण रेषेमुळे (रेड आणि यलो लाइन) बाधित झालेल्या हजारो नागरिक आणि प्लॉटधारकांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. सीना नदीची हद्द निश्चिती आणि पूररेषेच्या फेर सर्वेक्षणाचे काम प्रत्यक्षात सुरू झाले आहे. यामुळे शहरातील रखडलेला पुनर्विकास आणि नवीन बांधकामांचा मार्ग मोकळा होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.
भूमिअभिलेख विभागामार्फत 22 जूनपासून फेरसर्वेक्षणाचे काम सुरू करण्यात आले आहे. त्यासाठी सात जणांची नियुक्ती करण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात 9 गावांमधील 84 सर्व्हे नंबर निश्चित करण्यात आले आहेत. यामध्ये बोल्हेगाव, नागापूर, चाहराणा बुद्रुक, चाहुराणा खुर्द, नालेगाव, भिंगार, कल्याण रोड, सावेडी आणि बुरुडगाव या गावांचा समावेश आहे. सध्या या सर्व्हे नंबरवर ट्रेसिंगसाठी पॉइंट घेण्याचे काम सुरू आहे. जुनी टिपणे आणि सध्याची प्रत्यक्ष हद्द यांची तुलना करून नदीचे नेमके क्षेत्र किती कमी-जास्त होणार, हे ठरवले जाणार आहे. यानंतर दुसऱया टप्प्यात नदीच्या पूर्व व पश्चिम बाजूला रेड लाइन (लाल रेषा) आणि यलो लाइन (निळी/पिवळी रेषा) यांचे मार्ंकग केले जाणार आहे.
अहिल्यानगर शहरातून सीना नदीचे सुमारे 14 कि.मी. पात्र वाहते. शासनाच्या जुन्या आणि कडक निकषांमुळे नदीलगतच्या जवळपास 500 मीटर परिसरामध्ये कोणत्याही पक्क्या किंवा व्यावसायिक बांधकामांना परवानगी मिळत नव्हती. यामुळे शहरातील सुमारे 30 टक्के क्षेत्रातील नागरिकांना स्वतःच्या घराची दुरुस्ती, पुनर्विकास किंवा नवीन खरेदी केलेल्या प्लॉटवर बांधकाम करता येत नव्हते. त्यामुळे या गंभीर समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी आमदार संग्राम जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली सीना नदी पूरनियंत्रण रेषा विचार मंचची स्थापना करण्यात आली होती. या समितीने बैठका घेऊन सीना नदीच्या पूरनियंत्रण रेषेचे फेरसर्वेक्षणाची मागणी लावून धरली.
आमदार संग्राम जगताप यांनीही शासन दरबारी पाठपुरावा करीत फेरसर्वेक्षण मुद्दा लावून धरला. अखेरीस शासनाने संपूर्ण महाराष्ट्रात पूररेषेचे निकष शिथिल करण्याबाबत धोरणात्मक पाऊल उचलले आहे. यासाठी शासनाने फेरसर्वेक्षण आदेश काढले असून, एका 12 सदस्यीय तज्ञ समितीची नियुक्ती केली आहे. ही समिती पूररेषेचे पुनर्मूल्यांकन करेल, सुरक्षेच्या धोक्यांचा आढावा घेईल आणि रखडलेले गृहप्रकल्प मार्गी लावण्यासाठी टीडीआरसारख्या पर्यायांसह आवश्यक नियमावलीत सुधारणा सुचवणार आह
नदीच्या खोलीकरण, रुंदीकरणाचेही काम सुरू
n पूररेषेच्या फेरसर्वेक्षणासोबतच सीना नदीच्या खोलीकरणाचे आणि रुंदीकरणाचेही काम सुरू आहे. त्यासाठी शासनाने 23 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. या निधीतून सीना नदीच्या खोलीकरणाचे आणि रुंदीकरणाचे पहिल्या टप्प्यातील काम पूर्णत्वाकडे जात आहे. यामुळे नदीची पाणी वाहून नेण्याची क्षमता वाढेल आणि पुराचा धोका कमी होऊन पूरनियंत्रण रेषा अधिक सुरक्षित अंतरावर आणण्यास मदत होणार आहे.




























































