साईनगरीत पुन्हा 600 किलो निकृष्ट पेढे जप्त, ‘एफडीए’च्या फॅक्टरी, दुकानांवर धाडी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

श्रीक्षेत्र शिर्डीमध्ये अन्न व औषध प्रशासनाच्या (एफडीए) अन्न भेसळ प्रतिबंधक पथकाने आज पुन्हा एकदा पेढे उत्पादन करणाऱया फॅक्टरी आणि विक्री केंद्रांवर एकाचवेळी छापे टाकले. या कारवाईत सुमारे 600 किलो संशयास्पद व निकृष्ट दर्जाचे पेढे, तसेच इतर गोड पदार्थांचा साठा जप्त करण्यात आला. या कारवाईमुळे शहरातील मिठाई व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे. प्रसादाच्या नावाखाली विकल्या जाणाऱया पेढय़ांच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, भाविकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱयांविरोधात प्रशासनाने कठोर कारवाईचे संकेत दिले आहेत.

मागील 15 दिवसांपूर्वी शिर्डीतील काही दुकानांमध्ये बुरशीयुक्त पेढे आढळल्याच्या तक्रारी समोर आल्या होत्या. काही भाविकांनी अशा पेढय़ांचे व्हिडीओ आणि छायाचित्रे सोशल मीडियावर प्रसारित केल्यानंतर गंभीर दखल घेण्यात आली होती. त्यानंतर अहिल्यानगर अन्न व औषध प्रशासनाने विशेष अन्न भेसळ प्रतिबंधक पथकाची स्थापना करून आज सकाळपासून शिर्डीतील विविध भागांमध्ये धडक कारवाई सुरू केली. उत्पादन केंद्रांसह विक्रीची दुकाने, गोदामे आणि पॅकिंग युनिट्सची तपासणी करण्यात आली.

कारवाईदरम्यान अनेक पॅकबंद मिठाई उत्पादनांवर ‘कायदेशीर मापनशास्त्र्ा अधिनियम-2009’ आणि ‘पॅकेज बंद वस्तू नियम-2011’ अंतर्गत आवश्यक असलेली माहितीच नमूद नसल्याचे उघड झाले. नियमानुसार वस्तूचे नाव, निव्वळ वजन, उत्पादन व पॅकिंगची तारीख, कमाल किरकोळ किंमत (एमआरपी), उत्पादकाचा पत्ता आणि इतर तपशील नमूद करणे बंधनकारक असताना अनेक उत्पादकांनी या नियमांचे सर्रास उल्लंघन केल्याचे दिसून आले.

एफडीएच्या पथकाने संशयास्पद पेढे, मिठाई आणि इतर खाद्यपदार्थांचा साठा ताब्यात घेतला असून, तो अपर जिल्हाधिकारी कार्यालयात आणण्यात आला आहे. जप्त मालाचा पंचनामा करण्याची प्रक्रिया सुरू असून, संबंधित खाद्यपदार्थांचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात येणार आहेत. या नमुन्यांमध्ये निकृष्ट दर्जा, भेसळ अथवा मानवी आरोग्यास अपायकारक घटक आढळल्यास संबंधित उत्पादक आणि विक्रेत्यांवर अन्न सुरक्षा व मानके कायद्यानुसार कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.