
राज्य सरकारच्या 2019 मधील महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती योजनेतील लाभार्थी शेतकऱ्यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ देण्याची मागणी आम्ही केली होती त्याचे काय झाले, असा सवाल शिवसेनेचे कैलाश पाटील यांनी आज केला. त्यावर तुमचे मुद्दे मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील उपसमितीमध्ये मांडू असे आश्वासन कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले. त्यावर महाविकास आघाडीच्या सदस्यांचे समाधान झाले नाही. त्यावर ‘मामा, तुम्ही महाराष्ट्राला मामा बनवले, असा टोला मारत विरोधकांनी आज विधानसभेतून सभात्याग केला.
सत्तारूढ पक्षाच्या वतीने मंगळवारी नियम 293 अन्वये शेतकरी कर्जमाफीबाबत प्रस्ताव मांडण्यात आला होता. या चर्चेला कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी उत्तर दिले. 2019च्या कर्जमाफीतील लाभार्थ्यांचा पुनर्विचार करण्यासंदर्भात विरोधी सदस्यांनी मांडलेल्या मुद्दय़ांचा उत्तरात समावेश न केल्याचा आक्षेप विरोधकांनी घेतला. 2029मधील शेतकऱ्याची कर्जमाफी करण्याची मागणी केली होती, त्याचे काय झाले, असा प्रश्न कैलास पाटील यांनी केला. यावर याबाबत तुमचे मुद्दे समितीच्या बैठकीत मांडू, असे उत्तर दत्तात्रय भरणे यांनी दिले. पण त्यावर विरोधकांचे समाधान झाले नाही. त्यांनी सरसकट कर्जमाफीची मागणी करीत सभात्याग केला. कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांना त्यांचे जवळचे लोक ‘दत्तामामा’ या नावाने हाक मारतात. त्याचा धागा पकडत विरोधकांनी मामा, तुम्ही महाराष्ट्राला ‘मामा’ बनवलेत अशा घोषणा देत विरोधकांनी सभात्याग केला.



























































