
अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांची बदली करण्यासाठी मोठी सुपारी घेण्यात आली आहे. ड्रग्स लॉबी, औषध कंपन्यांनी एकत्र येऊन यासाठी 250 कोटी रुपये गोळा केल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी विधानसभेत केला. तसेच अन्न औषध प्रशासन विभाग झिरवाळ चालवत नसून ते दुसरेच कोणीतील चालवत असल्याचा आरोपही त्यांनी केला. या प्रश्नाला उत्तर देताना, तुकाराम मुंढे हे चांगले काम करत असून त्यांना थांबवले जाणार नाही अथवा त्यांची बदली केली जाणार नसल्याचे झिरवाळ यांनी स्पष्ट केले.
राज्यातील बेकायदा गुटखा विक्री, अन्नपदार्थांमधील भेसळ, बोगस औषधांच्या विरोधात धडक कारवाई सुरू केल्याने चर्चेत आलेला अन्न आणि औषध प्रशासन विभागाकडे पुरेसे मनुष्यबळ, अधिकाऱ्यांना लागणारी वाहने, कार्यालये आणि अन्न तपासणीच्या प्रयोगशाळा नसल्याची कबुली अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे (एफडीए) मंत्री नरहरी झिरवाळ यांनी आज विधानसभेत दिली.
विभागातील 350 मंजूर पदांपैकी 316 कार्यरत असून 43 रिक्त आहेत. औषध निरीक्षकांची 200 पदे मंजूर असून यापैकी 159 पदे भरलेली नाहीत. अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांची 197 पदे भरली आहेत. औषध निरीक्षक पदासाठी 400 कर्मचाऱ्यांची गरज आहे. पेंद्र सरकारच्या धोरणानुसार एक हजार अन्न आस्थापनांना एका अधिकाऱ्याची आवश्यकता असल्याचे ते म्हणाले.



























































