
केंद्रातील मोदी सरकारकडून ईडी, आयकर विभाग आणि सीबीआय यांचा वापर ‘राजकीय उद्देशांसाठी’ आणि विरोधकांना त्रास देण्यासाठी केला जात आहे, असा गंभीर आरोप कर्नाटकातील मंत्री प्रियांक खरगे यांनी बुधवारी केला. केंद्रात मोदी सरकार आल्यापासून म्हणजेच मागील 12 वर्षांपासून हजारो छापे मारूनही ईडीच्या ‘दोषसिद्धीचे प्रमाण’ अत्यंत कमी राहिले आहे, असेही ते यावेळी म्हणाले.
विरोधी पक्षांतील नेत्यांवर ईडी, सीबीआय आणि आयकर विभागाकडून छापे मारले जात आहेत, परंतु मागील 12 वर्षांतील आकडेवारी पाहिल्यास यामागे राजकीय हेतू असल्याचे स्पष्ट दिसून येतो. संपूर्ण देशात गेल्या 12 वर्षांत हजारो छापे टाकण्यात आले आहेत. मात्र, दोषसिद्धीचे प्रमाण दोन टक्क्यांपेक्षाही कमी आहे, असे ते म्हणाले.



























































