
सत्ता येते-जाते, पण विचारांशी असलेली निष्ठा कायम ठेवली पाहिजे. कधी सत्तेत असू, तर कधी विरोधात; मात्र संघर्षाची भूमिका सोडता कामा नये, असे मत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी दिल्ली येथे पत्रकारांशी संवाद साधताना व्यक्त केले.
उद्धव ठाकरे यांच्याशी भेट होत नसल्याच्या चर्चांबाबत बोलताना त्या म्हणाल्या, “उद्धवजी भेटत नाहीत, या चर्चेत कोणतेही तथ्य नाही. शिवसेनेचा पक्ष पुन्हा एकदा फोडण्यात आला आहे. या घटनेचा मी जाहीर निषेध करते.” तसेच यापूर्वी आयकर विभाग, सीबीआय आणि ईडीसारख्या केंद्रीय यंत्रणांचा वापर करून पक्ष फोडण्यात आले. आता कोणते नवीन मॉडेल वापरले जात आहे हे माहीत नाही, मात्र जे काही घडले ते अत्यंत दुर्दैवी आहे, असेही सुळे म्हणाल्या.
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या मराठी भाषेतील वाचनावरून सुरू झालेल्या वादावरही त्यांनी प्रतिक्रिया दिली. “राहुल नार्वेकर यांनी आशा भोसले आणि मराठी भाषेचा जो अपमान केला, तो अत्यंत खेदजनक आहे. त्याचा मी जाहीर निषेध करते. मराठी भाषा नीट येत नसेल, तर त्यांनी तिचे प्रशिक्षण घ्यावे,” असे त्या म्हणाल्या.
केंद्र सरकारवर टीका करताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, “आज सरपंचापासून ते पंतप्रधानांपर्यंत अनेक स्तरांवर एनडीएची सत्ता आहे. गेली 12 वर्षे ते सत्तेत आहेत. त्यामुळे आता 70 वर्षांचा हिशेब मागणे थांबवून त्यांनी स्वतःच्या 12 वर्षांच्या कारभाराचा हिशेब जनतेसमोर मांडावा.”
मध्य प्रदेशातील कथित जमीन घोटाळ्याच्या आरोपांवर बोलताना त्यांनी गंभीर प्रश्न उपस्थित केले. “अयोध्या आणि उज्जैन ही आमच्यासाठी श्रद्धास्थाने आहेत. अशा पवित्र ठिकाणांशी संबंधित प्रकरणांमध्ये भ्रष्टाचाराचे आरोप होत असतील, तर त्याची सखोल चौकशी झाली पाहिजे. मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून पदाचा राजीनामा द्यावा. हा मुद्दा मी लोकसभेतही उपस्थित करणार आहे,” असे त्या म्हणाल्या.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘ना खाऊंगा, ना खाने दूंगा’ या घोषणेचा उल्लेख करत सुप्रिया सुळे म्हणाल्या, “जमीन घोटाळ्याच्या आरोपांची निष्पक्ष आणि पारदर्शक चौकशी व्हावी यासाठी मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी काही काळ बाजूला होण्याचा विचार करावा.”



























































