
>>विजय पांढरीपांडे<<
मी जन्मभर मास्तरकी केली. त्यामुळे प्रश्न विचारणे हा स्थायी स्वभाव. ‘जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही’ अशी म्हण आहे. त्यामुळे ही सवय माझ्याबरोबरच जाणार. अर्थात प्रश्न माझ्या एकटय़ाचे नाहीत.सर्वांचेच आहेत. समाजाचे हे प्रश्न आहेत.
अनेक गुह्यांत गुन्हेगार पकडले जातात.गुन्हा स्पष्ट दिसतो, पण त्यांना शिक्षा का होत नाही? एक तरुणी यूपीएससीला फसवून, खोटी कागदपत्रे सादर करून तिची निवड होते. नंतर गुन्हा सिद्ध होतो तरी ती मोकाट कशी? केवळ काढून टाकणं ही शिक्षा नाही. कडक शिक्षा झाल्याशिवाय संदेश जाणार कसा?
एका न्यायाधीशाच्या घरात जळलेल्या लाखोंच्या नोटा सापडतात.सगळे सिद्ध झालेले तरी हे महाशय राजीनामा देऊन मोकळे कसे सुटतात? पेन्शन वगैरेचे लाभ कसे घेतात? सामान्य नागरिकांनी हाच गुन्हा केला तर तो जेलमध्ये सडतो. हा भेदभाव का?
जेलमध्ये जाऊन आलेले निवडणूक कसे लढवू शकतात? ते मंत्री कसे होतात? लाखाचे पगार, पेन्शन कसे घेतात?बारावी पास व्यक्ती शिक्षणमंत्री होऊन आयआयटी डायरेक्टरच्या डोक्यावर कशी बसू शकते? सगळ्यांना शिक्षण पदवीचा नियम, अटी. मग लोकप्रतिनिधी, मंत्री यांना का नाही?
‘नीट’सारखा गोंधळ, सीबीएससीचे गोंधळ करणाऱ्या तज्ञ व्यक्ती गप्प का? ते चुका कबूल का करत नाहीत? त्यांच्यावर कारवाई का होत नाही? मुळात अशा बेजबाबदार व्यक्तीच्या नेमणुका होतातच कशा?
बुवाबाजी, स्त्रियांवर अत्याचार हे सगळे दिवसाढवळय़ा वर्षानुवर्षे चालू असताना पोलीस, तपास यंत्रणा कुठे असतात? त्यांना जबाबदार का धरले जात नाही? यात गुंतलेले अधिकारी, पुढारी सहीसलामत कसे सुटतात?
एखादा सरकारी अधिकारी, प्राध्यापक, कुलगुरू भ्रष्टाचाराच्या आरोपात गुन्हा सिद्ध होऊनही मोकाट कसा फिरतो? त्याची पेन्शन का गोठवली जात नाही? अद्दल घडेल,समाजात नामुष्की होईल अशी कडक शिक्षा का होत नाही? लहान मुलींवर, स्त्रियांवर अत्याचार करणाऱ्या नराधमाना चारचौघांत धिंड काढून ताबडतोब वचक बसेल अशी कठोर शिक्षा का दिली जात नाही?
सरकारी शिक्षणाची सोय उत्तम असल्याचा दावा असताना लाखो रुपये फी घेणाऱ्या टय़ुशन क्लासेसची गरज का भासते? ही समांतर इंडस्ट्री कोणत्या नियमाने चालते? त्यांच्यावर सरकारच्या कोणत्या खात्याचे नियंत्रण असते? मुले शाळेत अनुपस्थित असूनही तक्रार न करणाऱ्या शिक्षकांवर, शाळांवर, कॉलेजवर कारवाई का होत नाही?
सरकारी योजनेत खर्च होणारे पैसे, झालेल्या कामाची गुणवत्ता हे सगळे तपासून त्याचे रिपोर्ट जाहीर का केले जात नाहीत? आज बांधलेल्या रस्त्यावर लगेच खड्डे कसे पडतात?
सगळीकडे हा सावळागोंधळ चालू असताना सगळे व्यवस्थित चालू आहे अशा आभासी जगात राहणाऱ्यांना वास्तविकतेचे भान कधी येणार? खोटे अहवाल, खोटी आश्वासने यावर कुणी किती कुठपर्यंत विश्वास ठेवायचा?
जंगले नष्ट केली जात आहेत. त्याऐवजी अवैध, नियम झुगारून काँक्रीटची गगनचुंबी जंगले उभारली जात आहेत. जमिनीत पाणी नाही, पर्यावरण असंतुलित, अशुद्ध. ऋतुचक्र बदलले आहे. कुणी किती जागरुक झाले? नदीनाल्यांच्या शुद्धीकरणाचे काय झाले? अनेक खेडेगावांत शुद्ध पाणी नाही. आरोग्याच्या सोयी नाहीत. नीट रस्ते नाहीत. कुठे जातात कर गोळा करून भरलेले सरकारी तिजोरीतले करोडो रुपये?
एका स्त्राrवर आरोप होत असताना पाहून प्रभू येशू म्हणाले… ज्याने कधी पाप केले नाही त्यानेच दगड मारावा… गर्दी ओसरली म्हणे! अशी गोष्ट आहे. त्याच धर्तीवर जिथे कुठेही कधीही भ्रष्टाचार झाला नाही अशी संस्था, व्यवस्था शोधायची म्हटले तर गोष्टीतल्यासारखीच स्थिती निर्माण होईल का?
एकीकडे आपण देशभक्ती, राष्ट्रनिष्ठsच्या गोष्टी करतो अन् दुसरीकडे आजकालचे पक्षीय राजकारण याच तत्त्वांना तिलांजली देत फक्त स्वार्थाचा, सत्तेचा, जातीपातीचा, द्वेषाचा विचार का करते? आज इथे उद्या तिथे, ना यांचे, ना त्यांचे अशी विचारधारा का असते यांची? प्रश्नाची रांग न संपणारी आहे.





























































