
भारतात 15 वर्षे आणि त्याहून अधिक वयाचे 26.7 कोटी लोक तंबाखूचे सेवन करतात. 2011 मध्ये, 35 ते 69 वयोगटातील लोकांसाठी तंबाखू सेवनाचा आर्थिक खर्च 1,04,500 कोटी रुपये होता. भारत हा तंबाखूचा दुसरा सर्वात मोठा ग्राहक आणि उत्पादक देश आहे. भारतीय तंबाखू उद्योगाचे मूल्य 1.16 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे, एकटय़ा सरकारलाच दरवर्षी तंबाखू उत्पादनांवरून कराच्या स्वरूपात 76 हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त कमाई होते.
देशात दरवर्षी तंबाखूमुळे 13.5 लाखांहून अधिक अकाली मृत्यू होतात, ज्यामध्ये धूम्रपान आणि अप्रत्यक्ष धूम्रपानामुळे होणाऱ्या अंदाजे 12 लाख मृत्यूंचा समावेश आहे. धूरविरहित तंबाखूमुळे निर्माण होणाऱ्या जागतिक आरोग्य भारापैकी 70 टक्के भार भारताचा आहे. धूरविरहित तंबाखूच्या सेवनामुळे दरवर्षी 2,30,000 हून अधिक भारतीयांचा मृत्यू होतो. भारतातील तोंडाच्या कर्करोगाची जवळपास 90 टक्के प्रकरणे धूरविरहित तंबाखूच्या सेवनामुळे होतात. विडी आणि सिगारेट ओढणारे लोक धूम्रपान न करणाऱ्यांपेक्षा 6 ते 10 वर्षे लवकर मरतात. भारतातील कर्करोगाच्या एकूण प्रकरणांपैकी 27 टक्के प्रकरणे तंबाखूच्या वापरामुळे होतात. तंबाखू हा कर्करोग, हृदयरोग, मधुमेह, फुप्फुसांचे जुनाट आजार, पक्षाघात, वंध्यत्व, अंधत्व, क्षयरोग, तोंडाचे आजार आणि इतर अनेक आजारांसाठी एक अत्यंत धोकादायक घटक आहे.
तंबाखू हे आपल्या आजूबाजूला सहज उपलब्ध असलेले विष आहे. त्यामुळे होऊ शकणाऱ्या जीवघेण्या आजारांबद्दल आणि धोक्यांबद्दल आपणा सर्वांनाच चांगली जाणीव आहे. आपण टीव्ही, वर्तमानपत्रे आणि सोशल मीडियावर तंबाखूविषयी जनजागृतीच्या जाहिराती पाहतो. निरक्षरांपासून ते उच्च शिक्षितांपर्यंत, सर्व वयोगटांतील लोकांना त्याच्या दुष्परिणामांची साधारणपणे जाणीव आहे, पण तरीही तंबाखू सेवनाची गोष्ट कोणी गांभीर्याने घेत नाहीत. हीच सर्वात मोठी समस्या आहे.
लोकांनी व्यसनाबद्दल असे गैरसमज निर्माण केले आहेत की, जणू त्यांचे आयुष्यच त्यासाठी समर्पित आहे. काही म्हणतात की, तंबाखूमुळे त्यांची पचनक्रिया सुधारते, काही म्हणतात की, तंबाखूमुळे त्यांना चांगली झोप लागते, काही म्हणतात की, सिगारेट ओढल्याने त्यांना कामावर लक्ष केंद्रित करण्यास मदत होते. ते सिगारेट ओढायला सुरुवात करतात आणि मग त्याचे व्यसनात रूपांतर करतात. हळूहळू, तंबाखू शरीराला कमजोर करू लागतो, त्याचे अवयव पोखरतो आणि त्यांना महागडय़ा, असाध्य रोगांच्या उंबरठय़ावर आणून ठेवतो. मग सगळी संपत्ती खर्च केली तरी मृत्यूला जीवनात बदलू शकत नाही. मग आपले व्यसन भागवण्यासाठी आपण हे मौल्यवान आयुष्य जीवघेण्या आजारांना का बळी देतो? इतरांना देखाव्याच्या इच्छेपोटी आणि पालकांच्या नियंत्रणाच्या अभावामुळे किशोरवयीन आणि तरुण पिढी तंबाखू, सिगारेट आणि हुक्का ओढायला सुरुवात करते. आधुनिकतेच्या या भ्रमात शहरांमध्ये हुक्का पार्लरचे एक नवीन साम्राज्य फोफावत आहे, जे तरुणांच्या व्यसनाला खतपाणी घालत आहे.
तंबाखूचे सेवन विविध प्रकारे केले जाते, जसे विडी, सिगारेट, हाताने गुंडाळलेली सिगारेट, पाइप, सिगार, हुक्का, पाण्याचा पाइप, चुट्टा, धुमटी आणि चिल्लम. शिवाय, तंबाखूआधारित पान, खैनी, गुटखा, खर्रा आणि तंबाखू पान मसालादेखील वापरला जातो. मिश्री, गुल, बज्जर, गुडाखू इत्यादी तंबाखूजन्य पदार्थ दातांना आणि हिरड्यांना लावले जातात आणि नस्य हुंगले जाते. भारतात तंबाखूच्या सेवनामुळे दररोज अंदाजे 3,500 मृत्यू होतात. भारतात 15 वर्षे आणि त्याहून अधिक वयाचे 26.7 कोटी लोक तंबाखूचे सेवन करतात. 2011 मध्ये, 35 ते 69 वयोगटातील लोकांसाठी तंबाखू सेवनाचा आर्थिक खर्च 1,04,500 कोटी रुपये होता.
एखादी व्यक्ती स्वतः धूम्रपान करत नाही, परंतु दुसऱ्याद्वारे केलेल्या धूम्रपानाच्या धुराच्या संपर्कात येते आणि ऑक्सिजनसह तो धूर शरीरात श्वासावाटे आत घेते, तेव्हा ती व्यक्ती ‘सेकंडहँड स्मोकर’ असते. आपल्या घरात किंवा घराच्या आसपास कोणीही धूम्रपान करत असल्याचे आपण अनेकदा पाहतो, ज्याचा धूर संपूर्ण घरात पसरतो आणि घरातील इतर सदस्यही त्या धुराचे बळी ठरतात. जागतिक आरोग्य संघटनेनुसार, जे तंबाखूचे सेवन सोडत नाहीत, त्यांपैकी निम्म्याहून अधिक लोकांचा मृत्यू तंबाखूमुळे होतो. तंबाखूमुळे दरवर्षी 70 लाखांहून अधिक लोकांचा मृत्यू होतो. त्यापैकी अंदाजे 16 लाख लोकांचा मृत्यू अप्रत्यक्ष धूम्रपानाच्या संपर्कामुळे होतो. तंबाखूशी संबंधित आजारांमुळे अपंगत्व आणि दीर्घकाळ चालणारे वेदनादायी आजारही होतात.
भारत सरकारच्या वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयांतर्गत तंबाखू मंडळाची स्थापना करण्यात आली आहे. देशातील तंबाखू उद्योगाचा नियोजित विकास सुनिश्चित करणे हा तंबाखू मंडळ अधिनियम, 1975 चा उद्देश आहे. त्याच सरकारी वेबसाईटवरून मिळालेल्या माहितीनुसार, 2023-24 या वर्षात भारतीय तंबाखू निर्यातीचे मूल्य 12,005.89 कोटी रुपयांवर पोहोचले. मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या पाच वर्षांत तंबाखू उत्पादक शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट झाले आहे. तंबाखू उद्योगामुळे 2024-2025 मध्ये 46 दशलक्ष लोकांना प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार मिळाले, तसेच निर्यातीतून ?16,728.02 कोटींचा महसूल मिळाला. भारतीय तंबाखूची 127 देशांमध्ये निर्यातही केली जाते.
भारत हा तंबाखूचा दुसरा सर्वात मोठा ग्राहक आणि उत्पादक देश आहे. भारतीय तंबाखू उद्योगाचे मूल्य 1.16 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे, एकटय़ा सरकारलाच दरवर्षी तंबाखू उत्पादनांवरून कराच्या स्वरूपात 76 हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त कमाई होते. ‘निकोटिन ऍण्ड टोबॅको रिसर्च’ या नियतकालिकात प्रकाशित झालेल्या एका शोध निबंधानुसार, तंबाखूजन्य पदार्थांवर उत्पादन शुल्क म्हणून गोळा होणाऱ्या प्रत्येक शंभर रुपयांमागे तंबाखू सेवनामुळे समाजावर 816 रुपयांचा आर्थिक भार पडतो. यावरून हे सिद्ध होते की, तंबाखूचा वापर हा राष्ट्रीय तिजोरीवर एक मोठा आर्थिक भार आहे.
तंबाखू किंवा इतर कोणतेही व्यसन सोडण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपली स्वतःची इच्छाशक्ती. जर आपण दृढनिश्चयी असू तर आपल्याला पाठिंबा देण्यासाठी अनेक लोक आणि संस्था सेवेत उपलब्ध असतात. तंबाखू सोडल्याने खर्चिक आजार आणि वेदनादायी अकाली मृत्यू टाळता येतात. निर्व्यसनामुळे आपल्या शरीरातील अवयव अधिक कार्यक्षमतेने कार्य करू शकतात आणि गंभीर आजारांचा धोका कमी होतो. आरोग्य सेवेवरील खर्च कमी केल्याने आपण आयुष्यातील इतर महत्त्वाच्या खर्चासाठी अधिक पैसे वाचवतो. तंबाखू सोडणे हे आपल्या मुलांसाठी, कुटुंबासाठी आणि समाजासाठी एक आदर्श निर्माण करते. तंबाखूचे व्यसन सोडण्यासाठी सरकारकडून सुविधाही उपलब्ध आहेत. व्यसनमुक्ती समुपदेशन केंद्रे जिल्हा स्तरावर उपलब्ध आहेत. तंबाखू व्यसनमुक्ती केंद्र किंवा जिल्हा तंबाखू नियंत्रण केंद्र लोकांना त्यांचे व्यसन सोडण्यास मदत करण्यासाठी मोफत वैद्यकीय समुपदेशन, वर्तणूक थेरपी आणि औषधोपचार पुरवते. आपण शहरभरातील अनेक स्थानिक विशेष वैद्यकीय सुविधा, सामुदायिक व्यसन मुक्ती केंद्रे आणि स्वयंसेवी संस्थांमध्ये उपचार घेऊ शकतो.





























































