
NEET-UG 2026 फेरपरीक्षेच्या पार्श्वभूमीवर लावण्यात आलेली टेलिग्रामवरील तात्पुरती बंदी गुगलने हटवली आहे. हिंदुस्थानातील अँड्रॉइड वापरकर्त्यांसाठी टेलिग्राम ॲप पुन्हा प्ले स्टोअरवर उपलब्ध करून दिले आहे. त्यामुळे आता वापरकर्ते हे ॲप पुन्हा डाउनलोड आणि अपडेट करू शकतात. केंद्र सरकारने परीक्षा गैरप्रकार आणि प्रश्नपत्रिका फुटीच्या संशयित प्रकरणांमध्ये टेलिग्रामचा वापर होत असल्याचा आरोप करत 22 जूनपर्यंत या प्लॅटफॉर्मवर निर्बंध लागू केले होते. इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने (MeitY) माहिती तंत्रज्ञान कायदा 2000 मधील कलम 69A अंतर्गत ही कारवाई केली होती. हा निर्णय राष्ट्रीय परीक्षा संस्था (NTA) यांच्या शिफारशीनंतर घेण्यात आला होता.
केंद्र सरकारच्या मते, काही टेलिग्राम चॅनेल्सद्वारे कथित NEET प्रश्नपत्रिकांची विक्री आणि परीक्षा-संबंधित गैरप्रकारांना चालना दिली जात होती. टेलिग्राममधील ओळख लपवण्याची सुविधा, स्वयंचलित बॉट्स, संदेश फॉरवर्डिंग आणि क्लाउड-आधारित प्रणालीमुळे अशा कारवायांवर नियंत्रण ठेवणे कठीण होत असल्याचा दावा सरकारने केला होता. सरकारने न्यायालयात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात केवळ आक्षेपार्ह मजकूर हटवणे पुरेसे ठरत नसल्याचे नमूद केले होते. त्यामुळे संपूर्ण प्लॅटफॉर्मवर तात्पुरते निर्बंध लावण्याचा निर्णय घेण्यात आला. असे वृत्त टाइम्स आॅफ इंडियाने दिले आहे.
टेलिग्राम पुन्हा सुरू झाल्यानंतर काही वापरकर्त्यांना त्यांच्या खात्यात पुन्हा लॉग-इन करावे लागू शकते. यामुळे ॲपचे सर्व्हरशी योग्यरित्या सिंक्रोनायझेशन होऊन संदेश आणि डेटा पूर्ववत उपलब्ध होईल. सध्या टेलिग्राम हे ॲप गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध झाले असले तरी, आयफोन वापरकर्त्यांसाठी ते अद्याप ॲप स्टोअरवर पुनर्स्थापित होण्याची प्रतीक्षा कायम आहे.

























































