जम्मू-कश्मीरमध्ये संशयास्पद कबुतर आढळले, पायात कोड नंबरची अंगठी; पाकिस्तानी चलनही सापडले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जम्मू-कश्मीरमधील सांबा जिल्ह्यात एक संशयास्पद कबुतर आढळल्याने सुरक्षा यंत्रणांमध्ये खळबळ उडाली आहे. या कबुतराच्या पायात कोड नंबर असलेली अंगठी, त्याच्यासोबत उर्दू भाषेत हाताने लिहिलेली संशयास्पद चिठ्ठी आणि पाकिस्तानी चलन आढळल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या घटनेनंतर परिसरातील सुरक्षा वाढवण्यात आली असून, येणाऱ्या-जाणाऱ्या लोकांवर लक्ष ठेवले जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सांबा जिल्ह्यातील सीमावर्ती मावा गावात काली माता मंदिराजवळ हे कबुतर आढळले. कबुतराच्या पायात कोड नंबर असलेली अंगठी असल्याचे स्थानिक नागरिकांच्या निदर्शनास आले. त्यानंतर त्यांनी कबुतर पकडून याबाबत पोलिसांना माहिती दिली. तपासणीदरम्यान कबुतरासोबत पाकिस्तानी चलन आणि उर्दू भाषेत हाताने लिहिलेली एक चिठ्ठी आढळल्याची माहिती आहे. त्यानंतर हे कबुतर संबंधित यंत्रणा आणि पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

या घटनेची माहिती स्थानिक पोलीस आणि गुप्तचर यंत्रणांना देण्यात आली आहे. त्यानंतर संबंधित यंत्रणांनी तपास सुरू केला आहे. कबुतराच्या पायातील अंगठीवर असलेल्या कोड नंबरचा अर्थ काय आहे, त्याच्यासोबत सापडलेल्या चिठ्ठीत नेमके काय लिहिले आहे आणि पाकिस्तानी चलन त्याच्यासोबत असण्यामागे काय कारण आहे, याचा शोध घेतला जात आहे.

हे कबुतर नेमके कुठून आले, त्याचा सीमेपलीकडे काही संबंध आहे का आणि त्याच्यासोबत सापडलेल्या वस्तूंचा उद्देश काय होता? याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे तपास पूर्ण झाल्यानंतरच या प्रकरणातील नेमके तथ्य स्पष्ट होणार आहे. कबुतरासोबत पाकिस्तानी चलन, संशयास्पद चिठ्ठी आणि कोड नंबर असलेली अंगठी आढळल्याने सुरक्षा यंत्रणा या प्रकरणाकडे गांभीर्याने पाहत आहेत.

यापूर्वीही पाकिस्तानच्या एअरलाइनच्या चिन्हासह आढळला होता संशयास्पद फुगा

गेल्या काही आठवड्यांपासून जम्मू-काश्मीरमधील सीमावर्ती भागांत पाकिस्तानशी संबंधित असल्याचा संशय असलेल्या फुग्यांच्या आणि कबुतरांच्या घटना समोर येत आहेत. त्यामुळे सुरक्षा यंत्रणांची चिंता वाढली आहे. काही दिवसांपूर्वी जम्मूतील खौर परिसरातील पलनवाला येथे विमानाच्या आकाराचा एक संशयास्पद फुगा आढळला होता. या फुग्यावर पाकिस्तानच्या PIA या विमान कंपनीचे चिन्ह असल्याची माहिती समोर आली होती.

आता सांबा जिल्ह्यात पाकिस्तानी चलन आणि उर्दूतील चिठ्ठीसह कबुतर आढळल्याने सीमावर्ती भागातील सुरक्षेचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. मात्र, या घटनांचा परस्परांशी काही संबंध आहे का, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.