Himanshu Bhau – 17 व्या वर्षी पहिला खून, लॉरेन्स बिष्णोईचा कट्टर शत्रू; मोस्ट वॉन्टेड हिमांशू भाऊला अमेरिकेत अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हरयाणातील कुख्यात गँगस्टर आणि हिंदुस्थानातील मोस्ट वॉन्टेड फरार आरोपी हिमांशू भाऊला अमेरिकेत अटक करण्यात आले आहे. अमेरिकेची तपास यंत्रणा फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशनने (एफबीआय) त्याला ताब्यात घेतल्याचे वृत्त ‘इंडिया टुडे‘ने दिले आहे. हिमांशू भाऊ याच्यावर दिल्ली आणि हरयाणामध्ये हत्या, हत्येचा प्रयत्न, खंडणी वसुली, बेकायदा शस्त्रास्त्रे बाळगणे आणि गुन्हेगारी कट रचणे यासारख्या अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे.

हिमांशू भाऊ याचे खरे नाव हिमांशू रितोलिया असे आहे. तो हरयाणातील रोहतक जिल्ह्यातील रितोली गावचा रहिवासी आहे. त्याने परदेशात राहून दिल्ली-एनसीआर, हरयाणा आणि पंजाब या भागांत गुन्हेगारीचे जाळे उभारल्याचा आरोप आहे. त्याच्याविरोधात अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद असल्याने दिल्ली पोलीस, हरयाणा पोलीस आणि राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) त्याच्या शोधात होत्या. ऑगस्ट 2023 मध्ये भारतीय तपास यंत्रणांच्या विनंतीवरून इंटरपोलने त्याच्याविरोधात रेड नोटीस जारी केली होती.

कोण आहे हिमांशू भाऊ?

हिमांशू भाऊचा जन्म 2002 मध्ये झाला. हरयाणातील संघटित गुन्हेगारी विश्वात कमी वयात नाव कमावलेल्या गँगस्टरमध्ये त्याची गणना केली जाते. अल्पवयातच तो गुन्हेगारीकडे वळला. अवघ्या 17 व्या वर्षी त्याने पहिला खून केला होता. 2020 मध्ये इतर काही कैद्यांसोबत त्याने बालसुधारगृहातून पलायन केल्याची माहितीही समोर आली होती. त्यानंतर त्याचे नाव अनेक गंभीर गुन्ह्यांच्या तपासात पुढे आले. त्याच्याशी संबंधित गुन्हेगारी टोळीचे जाळे अनेक राज्यांमध्ये पसरले होते. परदेशात राहून हिंदुस्थानातील साथीदारांच्या मदतीने गुन्हेगारी कारवाया चालवल्याचा आरोप तपास यंत्रणांनी केला आहे. हत्या, हत्येचा प्रयत्न, खंडणी, बेकायदा शस्त्रास्त्रांचा वापर आणि गुन्हेगारी कट यांसारख्या प्रकरणांमध्ये त्याचा सहभाग असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. हिमांशू भाऊचा संबंध नीरज बवाना टोळीशी असून लॉरेन्स बिष्णोई आणि गोल्डी ब्रार टोळीशी त्याचे हाडवैर असल्याचे बोलले जाते. या टोळीयुद्धातून अनेक हिंसक घटना घडल्या.

दिल्लीतील गोळीबार आणि हत्यांच्या घटनांशी संबंध

हिमांशू भाऊ आणि त्याच्या टोळीतील सदस्यांची नावे दिल्ली व हरयाणातील अनेक चर्चित गोळीबार आणि हत्या प्रकरणांमध्ये समोर आली आहेत. दिल्लीतील बर्गर किंग आउटलेटमध्ये झालेली हत्या, यूट्यूबर एल्विश यादव याच्या निवासस्थानाबाहेर झालेला गोळीबार आणि इतर हल्ल्यांशी त्याच्या टोळीचे संबंध असल्याचा आरोप तपास यंत्रणांनी केला आहे. व्यावसायिकांना धमकावणे, गोळीबाराच्या माध्यमातून दहशत निर्माण करणे आणि खंडणीची मागणी करणे, अशा प्रकारच्या कारवायांमध्ये या टोळीचा सहभाग असल्याचा संशय आहे. 2022 मध्ये हरयाणात अवघ्या 24 तासांत तीन हत्या झाल्यानंतर हिमांशू भाऊचे नाव पोलिसांच्या तपासात चर्चेत आले होते. या हल्ल्यांसाठी सशस्त्र साथीदारांचा वापर करण्यात आल्याचा आरोपही तपास यंत्रणांनी केला होता. अलीकडच्या काळात दिल्लीतील एका प्रॉपर्टी डीलरची हत्या झाल्याप्रकरणीही हिमांशू भाऊच्या टोळीतील सदस्यांची चौकशी करण्यात आली. सप्टेंबर 2026 मध्ये दिल्ली पोलीसांनी चकमकीनंतर दोन शूटरना अटक केली होती. या प्रकरणात एका अल्पवयीन साथीदारालाही ताब्यात घेण्यात आले होते.

इंटरपोलची रेड नोटीस

हिमांशू भाऊविरोधात ऑगस्ट 2023 मध्ये इंटरपोलने रेड नोटीस जारी केली होती. त्या वेळी त्याच्यावर हत्या, हत्येचा प्रयत्न, खंडणी, गुन्हेगारी धमकी आणि बनावट कागदपत्रांशी संबंधित 18 गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले होते. आता त्याला अमेरिकेत अटक करण्यात आली असून हिंदुस्थानात आणण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत.