
विकासाच्या नावाखाली आणखी एक प्रकल्प माथी मारून रायगड व पुणे जिह्यातील 576 एकरवरील जंगल नष्ट करण्याचा डाव आखला गेला आहे. गुजरातच्या टोरंट पॉवर कंपनीला महायुती सरकारने पायघडय़ा घातल्या असून जलविद्युत साठवण प्रकल्पासाठी कर्जत-भीमाशंकरच्या जंगलातील अडीच लाख झाडांवर कुऱहाड चालवली जाणार आहे. सायडोंगर भागात झाडांची बेसुमार कत्तल सध्या सुरू आहे. स्थानिकांचा त्याला कडाडून विरोध आहे.
सायडोंगर परिसरात गुजरातच्या टोरंट कंपनीचा जलविद्युत प्रकल्प उभारण्यात येणार आहे. सुमारे 13,500 कोटी रुपये खर्चाचा आणि तीन हजार मेगावॅट क्षमतेचा हा प्रकल्प आहे. या प्रकल्पासाठी लाखो झाडे तोडली जाणार आहेत. त्यामुळे पक्षी आणि वन्यजीवांचा नैसर्गिक अधिवास नष्ट होणार असून डोंगर उतारावरील माती, पाण्याचा नैसर्गिक प्रवाह, पारंपरिक शेती, पर्यटन यावरही गंभीर परिणाम होणार आहे. त्यामुळे पर्यावरणप्रेमींमध्ये प्रचंड संताप आहे.
जखम मांडीला, मलम शेंडीला
टोरंट पॉवर प्रकल्पासाठी तोडण्यात येणाऱया लाखो झाडांच्या बदल्यात रत्नागिरी जिह्यात वृक्ष लागवड करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता, मात्र तेथे मंजुरी न मिळाल्याने आता जालना जिह्यात पर्यायी वृक्ष लागवड करण्यात येणार असल्याची चर्चा आहे. मात्र या प्रक्रियेची अधिकृत कागदपत्रे किंवा सद्यस्थिती स्पष्ट झालेली नाही. शिवाय, जालन्यात पर्यायी वृक्ष लागवड केल्याने कर्जत-भीमाशंकरचे जंगल पूर्ववत होईल का? येथील वन्यजीवांना त्यांचा अधिवास परत मिळेल का? असे प्रश्न पर्यावरणप्रेमींनी उपस्थित केले आहेत. हा प्रयोग म्हणजे जखम मांडीला, मलम शेंडीला… असा प्रकार असल्याचा संताप व्यक्त होत आहे.
‘झाडखाऊ’ सरकार
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी ‘एक्स’वर सविस्तर पोस्ट लिहून राज्य सरकारवर हल्ला चढवला आहे. ‘कर्जतचा निसर्गरम्य परिसर मुंबई-पुण्याचे हवामान संतुलित राखण्यात मोठी भूमिका बजावतो. तिथली वनसंपदा नष्ट झाल्यास पर्यावरणीय समतोल बिघडणार असून स्थानिक आदिवासींचा जगण्याचा प्रश्नही गंभीर बनणार आहे. याला सर्वस्वी भांडवलदारांच्या हातचे बटिक बनून काम करणारे हे भाजप सरकार जबाबदार आहे. या ‘झाडखाऊ’ सरकारने महाराष्ट्राचं वाळवंट करण्याचा विडाच उचलला आहे की काय, असा संतप्त सवाल रोहित पवार यांनी केला. ही केवळ वृक्षतोड नसून एका इकोसिस्टीमचा अंत आहे. याचे गंभीर परिणाम भविष्यात भोगावे लागतील, असा इशाराही त्यांनी दिला.
प्रकल्प अदानींच्या घशात घालणार का?
टोरंट प्रकल्पाच्या नावाखाली 576 एकरचे जंगल नष्ट करून नंतर हा प्रकल्प अदानी समूहाच्या घशात घालणार का, असा सवाल कर्जत तालुका पर्यावरण बचाव संघर्ष समितीचे ऍड. कैलास मोरे यांनी केला आहे. प्रकल्पाबाबत टोरंट पॉवर कंपनी, वन विभाग आणि प्रशासनाने लपवाछपवी न करता जाहीरपणे माहिती द्यावी अशी मागणी मोरे यांनी केली आहे. यासंदर्भात आमची समिती हरित लवादाकडे दाद मागणार असल्याचे त्यांनी सांगितले.































































