रस्त्यावर धावणारी, हवेत झेपावणारी टेस्लाची नवी कार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अमेरिकेच्या टेक्सासमध्ये टेस्लाच्या ‘रोडस्टर’ या इलेक्ट्रिक स्पोर्ट्स कारची एक नवीन आवृत्ती सादर करण्यात आली. या कारला खऱ्या अर्थानं उडणारी कार असल्याचं म्हटलं जात आहे. या कारमध्ये थ्रस्टर्स लावण्यात आलेले आहेत. त्यांच्या मदतीनं ही कार जमिनीपासून वर उडू शकते आणि हवेत वळूही शकते. स्पेसएक्स कंपनीच्या एका केंद्रामध्ये ही कार सर्वांसमोर सादर केली. टेस्लाने रोडस्टर मॉडेलला रिडिझाईन करून तिचं उडणाऱ्या कारमध्ये रूपांतर केले आहे. हे ‘एआय’ नसून ही कार आहे हे सिद्ध करण्यासाठी इथं प्रेक्षकांची उपस्थिती आवश्यक होती, असं मस्क म्हणाले. इलॉन मस्क यांनी त्यांच्या एक्स हँडलवर या उडणाऱ्या कारच्या डेमोचा एक व्हीडिओ पोस्ट केला. टेस्लानं या दोन आसनी कारमध्ये स्पेसएक्सनं विकसित केलेले कोल्ड गॅस थ्रस्टर्स लावले आहेत. पण, उडण्याची क्षमता असली तरी ही वाहनं रस्त्यावर वापरण्यासाठी तयार आहेत की नाही, याबाबत अद्याप माहिती दिली नाही. टेक्सासमधील डेमोदरम्यान, रोडस्टर सेकंड जनरेशन कार एका मोठ्या कार रॅम्पवर चढते आणि नंतर रॅम्पवरून वेगाने खाली जाते. त्यानंतर गाडी हवेत वळते आणि जमिनीवर सुरक्षितपणे उतरते. या कारमध्ये हवेत स्वतला नियंत्रित करण्यासाठी उंची वाढवणारे थ्रस्टर्स आणि मागे मुख्य थ्रस्टर्स आहेत. ही कार अगदी रॉकेटप्रमाणे उड्डाण करू शकते आणि हवेत कसरतीही करू शकते.