दुष्काळात महागाईचा भडका! तांदूळ-ज्वारीनेही गाठले आभाळ! दिवाळीच्या तोंडावर सर्वसामान्यांचे जगणे महागले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> दीपक बाऱ्हाळीकर

मराठवाड्यासह संपूर्ण महाराष्ट्रात दुष्काळाच्या झळांनी शेतकरी आणि कष्टकरी मेटाकुटीला आले असताना बाजारपेठेत महागाईने आणखी एक बॉम्बगोळा टाकला आहे. आधी खाद्यतेलाचे दर वाढले, पाठोपाठ साखरेने भाव खाल्ला आणि आता तांदूळ व ज्वारीच्या किमतींनीही उसळी घेतली आहे. दिवाळीचा सण तोंडावर असताना स्वयंपाकघरातील धान्यच महागल्याने सर्वसामान्यांच्या संसाराचे आर्थिक गणित पूर्णपणे कोलमडले आहे. हाताला काम नाही, खिशात पैसा नाही आणि बाजारात वस्तूंचे दर मात्र आभाळाला भिडले आहेत! अशा दुहेरी संकटात सामान्य जनतेने संसार चालवायचा तरी कसा, हा संतप्त सवाल उपस्थित होत आहे.

दुष्काळामुळे ग्रामीण भागातील रोजगाराची चाके मंदावली आहेत. उत्पन्नाचे स्रोत आटत असताना घरखर्च मात्र दिवसेंदिवस वाढत आहे. त्यातच रोजच्या जेवणातील तांदूळ आणि ज्वारी महागल्याने सर्वसामान्यांच्या ताटावरही महागाईचे सावट पडले आहे. सणासुदीच्या काळात आनंद साजरा करायचा की घरखर्चाची जुळवाजुळव करायची, अशी कोंडी कुटुंबांसमोर उभी ठाकली आहे. दिवाळीच्या खरेदीची तयारी करण्याऐवजी नागरिकांना आता दोन वेळच्या जेवणाचा हिशेब मांडावा लागत आहे.

एकेकाळी परवडणाऱ्या दरात मिळणारा तांदूळ आता ग्राहकांच्या खिशाला कात्री लावत आहे. साध्या तांदळाचा दर पूर्वी किलोमागे सुमारे ५० रुपये होता; तो आता ८० रुपयांपर्यंत पोहोचल्याचे सांगितले जात आहे. कोलम तांदळाचा दर ६० रुपयांवरून थेट ९० रुपये किलोपर्यंत गेल्याने ग्राहकांना मोठा आर्थिक फटका बसत आहे. पूर्वी ९० रुपये किलो मिळणारा तांदूळ सध्या १२० रुपय किलो मळत आहे. तांदळाच्या काही प्रकारांत किलोमागे ४० ते ५० रुपयांपर्यंत वाढ झाल्याचे चित्र आहे. ज्वारीचे दरही सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर जात आहेत. गोरगरीबाची सुवर्णा ज्वारी पूर्वी ४० रुपये किलो मिळणारी आता ६० रुपये किलोपर्यंत पोहोचली आहे. पाच किलोसाठी पूर्वी २०० रुपये मोजावे लागत होते; आता त्याच प्रमाणासाठी २८० ते ३०० रुपये खर्च करावे लागत आहेत. बार्शी, मंठा, आंध्रा, गावरान टाळकी ज्वारीच्या दराने तर ग्राहकांना घाम फोडला आहे. पाच किलोसाठी पूर्वी सुमारे ३०० रुपये मोजावे लागत होते, तेच आता ४५० रुपयांपर्यंत पोहोचल्याचे व्यापाऱ्याकडून सांगितले जात आहे. महागाईची झळ केवळ तांदूळ आणि ज्वारीपुरती मर्यादित नाही. खाद्यतेलाचे दर १६० रुपयांवरून १९० ते २०० रुपयांपर्यंत, तर साखरेचे दर ४५ रुपयांवरून ५५ रुपये किलोपर्यंत वाढल्याचे बाजारातील दरांवरून दिसते. तेल, साखर, तांदूळ, ज्वारी तर महागले आहेच त्यात मुगडाळ, तूरडाळ, चनाडाळ उडदाची दाळ, मसूरदाळ तसेच मसाल्याचे भाव ही आभाळा टेकले आहेत. रोजच्या स्वयंपाकासाठी आवश्यक असलेल्या वस्तूंच्याच किमती वाढत असल्याने घरगुती अर्थव्यवस्थेवर ताण वाढला आहे.

मराठवाड्यातील कोरड्या दुष्काळाने पाणी नसल्या कारणाने जमनीमध्ये ओलंच राहिली नाही त्यामुळे शेतकऱ्यांच्या कष्टांची अक्षरशः माती होत असल्याचे विदारक चित्र दिसतं आहे. शेतीत लावलेला भाजीपाला ही हवा तसा पीकला जात नाही त्यामुळे भाजीपाल्याच्या खरेदीतही ग्राहकांना हात आखडता घ्यावा लागत आहे. वांगी, कोबी, गवार, शेवगा, कांदा, लसूण, आले, पालक, चवळी, कोथिंबीर, काकडी, लिंबू आणि बटाटे अशा रोजच्या वापरातील वस्तूंच्या किमतींमुळे बाजारात खरेदी करताना ग्राहकांची दमछाक होत आहे. अनेक भाज्यांसाठी पाव किलोला २५ ते ३० रुपये, तर अर्ध्या किलोसाठी ४० ते ५० रुपये मोजावे लागत असल्याने कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबांचे बजेट पार विस्कटले आहे.

बाजारातील तांदूळ आणि ज्वारीची आवक घटल्याने दरवाढ होत असल्याचे व्यापाऱ्यांकडून सांगितले जात आहे. उत्पादनातील घट आणि बाजारात पुरेसा माल उपलब्ध नसणे, ही त्यामागील प्रमुख कारणे असल्याचे सांगितले जाते. दुसरीकडे, साठवून ठेवलेल्या धान्याला अळी व किडीचा प्रादुर्भाव होत असल्याने व्यापाऱ्यांचेही नुकसान होत आहे. ज्वारीच्या साठ्यात किडीमुळे धान्याची गुणवत्ता घसरत असून, काही मालाचे पीठ होत असल्याने साठवणूक करणेही जिकिरीचे बनले आहे. मात्र, आवक कमी झाल्याच्या कारणाखाली दरवाढीचा सगळा भार ग्राहकांच्या माथी मारला जात आहे का, हा प्रश्नही अनुत्तरित आहे. बाजारातील प्रत्यक्ष साठा, पुरवठा आणि विक्रीचे दर यांची तपासणी केल्याशिवाय दरवाढीमागील नेमकी कारणे स्पष्ट होणार नाहीत.

दिवाळी म्हणजे आनंद, फराळ आणि कुटुंबासोबतचा उत्सव; पण यंदा दुष्काळ आणि महागाईच्या कात्रीत सापडलेल्या कुटुंबांसाठी हा सण आर्थिक कसोटी ठरत आहे. एका बाजूला रोजगाराची टंचाई आणि उत्पन्नात घट, तर दुसऱ्या बाजूला अन्नधान्यापासून भाजीपाल्यापर्यंत वाढणारे दर! सामान्य माणसाच्या खिशात पैसा नसताना बाजारातील किमती मात्र वाढतच आहेत. महागाईचा हा फटका असाच सुरू राहिला, तर दिवाळीचा आनंदही अनेकांच्या घरात खर्चाच्या चिंतेखाली दबला जाण्याची भीती आहे.

महागाईवर नियंत्रण आणा !

तांदूळ-ज्वारीच्या दरवाढीमागील कारणे तपासण्यासाठी जिल्हा प्रशासनाने घाऊक बाजारपेठा, गोदामे आणि वेअरहाउसची तातडीने पाहणी करावी. धान्यसाठा, आवक जावक आणि विक्रीदरांची पडताळणी करून साठेबाजी किंवा नियमभंग आढळल्यास कारवाई करावी. दिवाळीच्या तोंडावर तरी जीवनावश्यक वस्तूंचे दर नियंत्रणात आणून जनतेला दिलासा द्यावा !