‘पुष्पा 2’ चेंगराचेंगरी प्रकरण- अभिनेता अल्लू अर्जुन आज व्हर्च्युअली हजर, सुनावणी 6 जुलैपर्यंत ढकलली पुढे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

‘पुष्पा 2’ चित्रपटाच्या विशेष शो दरम्यान हैदराबादमधील संध्या थिएटरबाहेर झालेल्या चेंगराचेंगरी प्रकरणात सोमवार 22 जून रोजी अभिनेता अल्लू अर्जुन न्यायालयात व्हर्च्युअली हजर झाला होता. मात्र, या प्रकरणातील काही आरोपी अनुपस्थित राहिल्यामुळे न्यायालयाने ही सुनावणी 6 जुलैपर्यंत पुढे ढकलली आहे. हैदराबादमधील नामपल्ली फौजदारी न्यायालयाने या प्रकरणातील सर्व आरोपींना पुढील सुनावणीदरम्यान एकत्र हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.

एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, या प्रकरणातील एकूण 23 आरोपींपैकी केवळ 21 किंवा 22 जणच न्यायालयात हजर राहू शकले, तर 1 ते 2 आरोपी गैरहजर होते. त्यामुळे नामपल्ली येथील दंडाधिकाऱ्यांसमोर जामीन अर्जासाठी नियोजित असलेली आजची सुनावणी तहकूब करण्यात आली. संध्या थिएटर व्यवस्थापनाचे प्रतिनिधित्व करणारे वकील भानू चंदर यांनी न्यायालयाबाहेर प्रसारमाध्यमांशी बोलताना या माहितीला दुजोरा दिला. त्यांनी सांगितले की, पुढील सुनावणीत सर्व 23 आरोपींना न्यायालयात एकत्र हजर राहावे लागणार आहे.

ही दुर्दैवी घटना 4 डिसेंबर 2024 रोजी घडली होती. हैदराबादमधील संध्या थिएटरमध्ये अल्लू अर्जुनच्या बहुप्रतिक्षित ‘पुष्पा 2’ या चित्रपटाच्या विशेष शोचे आयोजन करण्यात आले होते. या शोदरम्यान अल्लु अर्जुनला पाहण्यासाठी चाहत्यांनी प्रचंड गर्दी केली होती. ही गर्दी अनियंत्रित झाल्याने तिथे चेंगराचेंगरी झाली. या दुर्दैवी घटनेत रेवती नावाच्या एका महिलेचा मृत्यू झाला होता, तर तिचा मुलगा श्री तेजा हा गंभीर जखमी झाला होता. या घटनेनंतर अल्लू अर्जुन आणि त्याचे वडील, चित्रपट निर्माते अल्लू अरविंद यांनी पीडित कुटुंबाला आर्थिक मदत म्हणून 2 कोटी रुपयांची मदत जाहीर केली होती.