फिलिपाईन्समध्ये शाळेत गोळीबारात तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू, पाच जण जखमी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

फिलिपाईन्समध्ये एका हायस्कूलमध्ये सोमवारी अज्ञात बंदुकधाऱ्यांनी केलेल्या हल्ल्यात तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला, तर पाच जखमी झाले. या घटनेमुळे स्थानिक परिसरात खळबळ उडाली असून विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. टॅक्लोबान शहरातील ‘सॅन होजे नॅशनल हायस्कूल’मध्ये ही घटना घडली. याप्रकरणी दोन संशयितांना पोलिसांनी अटक केली आहे.

इंडिया टीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, अटक केलेल्या दोघांपैकी एक जण त्याच शाळेचा विद्यार्थी आहे. जखमी विद्यार्थ्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पुढील तपास सुरू केला. घटनास्थळावरून दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी घटनास्थळाहून पिस्तुले जप्त केली आहेत.

पोलिसांनी शाळेच्या परिसरात कडक सुरक्षा व्यवस्था तैनात केली आहे. प्रत्यक्षदर्शींची चौकशी केली जात असल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले. या घटनेमुळे शाळेच्या परिसरातील सुरक्षा आणि शस्त्रास्त्रांची उपलब्धता यांबाबत पुन्हा चिंता व्यक्त केली जात आहे. भविष्यात अशा घटना रोखण्यासाठी कठोर उपाययोजना करण्याची मागणी नागरिक करत आहेत.