हवामानानुसार गाडीचा वेग बदलणार; नॅशनल हायवे अन् एक्सप्रेस वेवर वेगमर्यादेचे उल्लंघन केल्यास ई-चलान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

खराब हवामान असताना राष्ट्रीय महामार्ग आणि एक्सप्रेस वेवर होणारे अपघात टाळण्यासाठी पेंद्र सरकारने हवामानानुसार आता वेगमर्यादा लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. देशात पहिल्यांदाच, पाऊस, धुळीचे वादळ, धुके किंवा खराब हवामान असल्यास एक्सप्रेस वेवर वेग 60 ते 80 किमी प्रति तास करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तर हवामान स्वच्छ असेल तर गाडय़ांचा वेग जास्ती जास्त 100 आणि एक्सप्रेस वेवर 120 किमी प्रति तास इतकी मर्यादा असेल.

हवामान खराब असताना वेग मर्यादेचे पालन न केल्यास थेट ई चलान कापले जाईल आणि त्याबाबत मेल पाठवला जाणार आहे. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने मान्सूनमध्ये काही निवडक राष्ट्रीय महामार्ग आणि एक्सप्रेसवेवर डायनॅमिक स्पीड लिमिट लागू करण्याचा निर्णय घेतलाय.

हवामानाचा डेटा ट्राफिक मॅनेजमेंट सेंटरला

  • महामार्गावर जागोजागी अत्याधुनिक व्हिजिबिलिटी सेन्सर आणि वेदर स्टेशन्स लावण्यात आले आहेत. हवामानाचा अंदाज घेऊन त्याचा डेटा एनएचएआय मुख्य ट्राफिक मॅनेजमेंट सेंटरला पाठवेल. तिथून रियल टाइम महामार्गावर धावणाऱया कारच्या स्क्रीन, रस्त्यावरील डिजिटल बोर्ड आणि चालकांच्या पह्नवर अलर्ट पाठवला जातो. यामुळे गाडय़ांचा वेग तात्काळ कमी करण्यास मदत होईल.
  • जियो फेन्सिंग तंत्रज्ञानामुळे महामार्गावर एक व्हर्च्युअल बाउंड्री तयार केली जाईल आणि वाहने या परिसरात येताच टेलिकॉम टॉवरवरून चालकांच्या पह्नवर एक सुरक्षा मेसेज पोहोचेल. त्यात सेल ब्रॉडकास्ट तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल. इंटरनेट उपलब्ध नसतानाही मेसेज पोहोचेल.
  • आयआयटी तज्ञांनी तयार केलेल्या मॉडेलनुसार लागू झाल्यानंतर अपघाताच्या घटना 70 ते 80 टक्के कमी होतील.