
पुण्यातील कल्याणीनगर येथील गाजलेल्या पोर्शे कार अपघात प्रकरणातील आरोपी बिल्डर विशाल अग्रवाल यांच्या अडचणीत पुन्हा नव्याने वाढ होण्याची चिन्हे आहेत. जामीन मंजूर झाल्यानंतर व्हॉट्सॲप स्टेटसवर कथित जल्लोषाचा व्हिडिओ शेअर केल्याचा, आरोप करत पुणे पोलिसांनी त्यांचा जामीन रद्द करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. यासंदर्भात 23 जून रोजी सत्र न्यायालयात याचिका दाखल करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली.
कल्याणीनगरमध्ये भीषण पोर्शे अपघातात दोन तरुण आयटी अभियंत्यांचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर देशभरात संतापाची लाट उसळली होती. तपासादरम्यान पुराव्यांशी छेडछाड आणि गुन्ह्यातील सहभागाच्या आरोपांवरून विशाल अग्रवाल यांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने काही कठोर अटींसह त्यांना जामीन मंजूर केला.
पोलिसांच्या तपासात संबंधित व्हिडिओ विशाल अग्रवाल यांनी स्वतःच्या व्हॉट्सॲप स्टेटसवर ठेवला असल्याचे समोर आले आहे. हा स्टेटस पाहिलेल्या दोन व्यक्तींचे जबाब नोंदवण्यात आले असून, त्यासह उपलब्ध डिजिटल पुरावे न्यायालयासमोर सादर करण्यात येणार आहेत. या आधारे जामिनाच्या अटींचे उल्लंघन झाल्याचा दावा पोलिसांकडून केला जाणार आहे. जामीनाच्या अटींनुसार मृतांच्या कुटुंबीयांना मानसिक किंवा शारीरिक त्रास होईल, असे कोणतेही कृत्य आरोपीला करता येणार नाही. मात्र, जामीन मंजूर झाल्यानंतर सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला. या व्हिडिओत विशाल अग्रवाल कुटुंबीयांसोबत आनंदोत्सव साजरा करताना दिसत असल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.
दरम्यान, विशाल अग्रवाल यांनी हा व्हिडिओ 2023 मधील जुना असल्याचे स्पष्टीकरण दिले आहे. जामीन मिळाल्यानंतर साजऱ्या केलेल्या कोणत्याही जल्लोषाशी त्याचा संबंध नसल्याचा दावा त्यांनी केला आहे. मात्र, व्हिडिओ जुना असला तरी तो जामिनानंतर लगेच व्हॉट्सॲप स्टेटसवर ठेवणे हे मृतांच्या कुटुंबीयांच्या भावना दुखावणारे असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.
प्रकरणाची संवेदनशीलता, देशभरात निर्माण झालेली चर्चा आणि मृतांच्या कुटुंबीयांची मानसिक अवस्था लक्षात घेता जामिनाच्या अटींचा भंग झाल्याचा मुद्दा न्यायालयात ठामपणे मांडला जाणार असल्याचे पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले आहे. आता न्यायालय या याचिकेवर काय निर्णय देते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


























































