दिल्ली डायरी – अन्नामलाईंचे पुढे काय होईल?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> नीलेश कुलकर्णी

भाजपने ज्यांचा गवगवा क्रांतिकारी नेता असा केला होता, त्या अन्नामलाईंनी भाजपच्या जोखडातून स्वतःची कशीबशी सुटका करून घेतली आहे. आता हे अन्ना पुढच्या महिन्यात स्वतःचा पक्ष स्थापन करणार आहेत. भारतीय पोलीस सेवेतील प्रतिष्ठेची नोकरी सोडून हे राजकारणाच्या नादाला लागले. अगदी चाबकाने स्वतःला फोडून काढण्यापर्यंतची नौटंकी त्यांनी केली होती. अन्नांचे पुढे काय होते ते भविष्यात दिसेलच.

तामीळनाडूतील जनतेने भाजपकडे राजकीय पर्याय म्हणून आजपर्यंत पाहिलेले नाही. त्यामुळे भाजपसोबत राहून आयुष्यभर फक्त स्वतःवरच चाबकाचे कोरडे ओढावे लागतील हे अन्नामलाई यांच्या उशिरा का होईना ध्यानात आले व त्यांनी आपली चूक सुधारत भाजपमधून बाहेर उडी मारली. तामीळनाडूत सनातन व द्रविडी विरोधी राजकारणाची वातावरणनिर्मिती अन्नामलाई यांनी केली त्याचे श्रेय त्यांना द्यावेच लागेल. कोंगू म्हणजेच पश्चिमी तामीळनाडूत त्यांनी आपला प्रभाव निर्माण केला होता. मात्र हा प्रभाव सत्तेचा सोपान चढण्यासाठी पुरेसा नव्हता. भाजपची असणारी सनातनी प्रतिमा तामीळनाडूत सत्ता मिळवून देऊ शकणार नाही हे ध्यानात आल्यानंतर अन्नामलाई यांनी ‘हा माझा मार्ग वेगळा’ म्हणत स्वतःचा पक्ष स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. अन्नांचे पुढे काय होते ते भविष्यात दिसेलच.

एकेकाळी दिल्लीकरांचे ‘ब्ल्यू आईड बॉय’ असणारे अन्नामलाई नंतर दिल्लीकरांच्याच नजरेतून उतरायला लागले. त्याला कारणीभूत ठरली ती अन्नाद्रमुक सोबतची युती करण्याचा श्रेष्ठाRचा निर्णय. जयललितांच्या निधनानंतर अन्नाद्रमुकचा जनाधार झपाटय़ाने कमी होतो आहे. त्या पक्षासोबत युती आत्मघातकी ठरेल हे अन्नामलाई सांगत राहिले. मात्र श्रेष्ठाRनी त्यांचे म्हणणे तर ऐकले नाहीच, शिवाय अन्नाद्रमुकमधून भाजपमध्ये आलेल्या नागेंद्रन यांची प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करून अन्नामलाईंच्या जखमेवर मीठच चोळले. ही युती करण्याचा श्रेष्ठाRचा निर्णय घातक होता हे निकालाअंती दिसून आले. चारवरून भाजपची जेमतेम एक जागा राहिली. तामीळनाडूत द्रविडी राजकारणाला काटशह म्हणून अन्नामलाई यांनी दलित, अतिमागास, ओबीसी व इतर मायक्रो जातींना जोडण्याचे काम केले होते. युवा वर्गातही त्यांची ‘व्रेझ’ होती. अन्नाद्रमुकसोबतच्या युतीने त्या मेहनतीवर पाणी फेरले. त्यामुळे अन्नामलाई दुखावले गेले. यापुढे तामीळनाडूच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी मुख्यमंत्री विजय असणार आहेत. दोन्ही द्रमुकचा पाया ढासळतो आहे. शिवाय अंतर्गत गटबाजीने या दोन्ही पक्षांना ग्रासले आहे. माजी मुख्यमंत्री पनीरसेल्वम यांनी द्रमुकमध्ये उडी मारली. आता माजी मुख्यमंत्री पलानीसामी यांच्या विरोधात षणमुगम व वेलू यांनी शड्डू ठोकला आहे. अशा स्थितीत विरोधी पक्षाची ‘स्पेस’ भरून काढण्याचा प्रयत्न अन्नामलाई करतील. अर्थात त्यासाठी अन्नामलाईंना पूर्णपणे झोपून देऊन नवी इनिंग खेळावी लागेल.

रेसकोर्सचे ‘लोककल्याण’

नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान झाल्यापासून त्यांनी कोणती गोष्ट इमानइतबारे केली असेल तर ती म्हणजे नावे बदलणे. मग रस्ता असो, शहर असो की वास्तू, मोदींची नजर पडली की नाव बदललेच म्हणून समजा. देशाच्या पंतप्रधानांचे निवासस्थान ‘7 रेसकोर्स’ आहे, पण त्याचे नाव मोदींनी बदलून ‘लोककल्याण मार्ग’ असे केले. पंतप्रधान कार्यालयाचे नामकरण ‘सेवातीर्थ’ तर राजपथाचे नाव ‘कर्तव्यपथ’ करण्यात आले. त्यातून काय साध्य झाले? मोदी जिथे राहतात त्या ‘लोककल्याण मार्गा’च्या पुढेच घोडय़ांवर कोटय़वधींच्या बोली लावल्या जातात असा ‘रेसकोर्स’ आहे. सध्या घोडय़ांपेक्षा जास्त बोली विरोधी पक्षांच्या आमदार व खासदारांवर लावल्या जातात, त्याही पंतप्रधानांच्या मार्गदर्शनाखाली. त्या अर्थाने ‘लोककल्याण मार्गा’चे नामकरण मोदींनी सार्थ ठरवले आहे, तर दुसरीकडे देशातील सर्वात समृद्धी लायब्ररी असलेले नेहरू मेमोरियल, सरकारच्या दृष्टीने दारुडय़ांचा अड्डा असलेला जिमखाना क्लब आणि याच परिसरातील गोरगरीबांच्या झोपडय़ांवर ‘लोककल्याण मार्गा’तून वक्रदृष्टी पडलेली आहे. जिमखाना क्लब, रेसकोर्स, दिल्ली जयपूर पोलो ग्राऊंड आणि गोरगरीबांच्या झोपड्या हटविण्याचे काम सध्या जोरात सुरू आहे. हे कोणत्या उदात्त हेतूने सुरू आहे. ते समजण्यास मार्ग नाही. गेल्या 12 वर्षांत या सगळ्या गोष्टी जागच्या जागी होत्या. मात्र आता मोदीसाहेबांनी पंतप्रधानांसाठी 15 एकर जागेत ‘प्रधानमंत्री एन्कलेव्ह’ बांधला आहे. तिकडच्या आलिशान निवासात ते लवकरच राहायला जातील. जितक्या जमेल तितक्या ऐतिहासिक इमारतींची तोडपह्ड मोदींनी केली आहे. मोदी ‘लोककल्याण मार्ग’ सोडणार आहेत. मग त्या परिसरात इतकी साफसफाई करण्याचे कारण काय? मोदींना दिल्लीतील ही मोक्याची जागा कोण्या आवडत्या उद्योगपतीच्या तर घशात घालायची नाही ना? अनेक प्रश्न आहेत.

बदली बदली सी दीदी…

पश्चिम बंगालमधील दारुण पराभव व त्यानंतर पक्षात पडलेली उभी फूट यामुळे तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी या राजकीयदृष्टय़ा अडचणीत सापडल्या आहेत. त्यातच तृणमूलच्या नेत्यांवर दरदिवशी बंगालमध्ये हल्ले होत आहेत. ममतांचे भाचे अभिषेक हे नव्या सरकारच्या रडारवर आहेत. त्यामुळे सुरुवातीला रणरागिणीसारख्या ममता दीदी भाजप सरकारवर तुटून पडल्या. मात्र इंडिया आघाडीच्या बैठकीला दिल्लीला गेल्यापासून ‘बदली बदली सी दीदी’ सर्वांना दिसून आली. एरवी आक्रमक व आक्रस्ताळे राजकारण करणाऱया दीदींना ‘श्रद्धा व सबुरी’चा मंत्र कोणी दिला यावरून दिल्लीच्या राजकीय वर्तुळात खमंग चर्चा रंगली आहे, पण हा सल्ला एकदम चार्तुयाचा होता. सुरुवातीला दीदी भाजपच्या राजकीय कारवायांवर प्रतिक्रिया व्यक्त करत आक्रस्ताळेपणा करत होत्या. त्यामुळे त्यांच्या बद्दलची थोडीफार उरलेली सहानुभूतीही संपत होती. त्यामुळे जनतेत भाजप जाणीवपूर्वक आपल्याला त्रास देत आहे, असे चित्र निर्माण करा. वातावरण थोडे शांत होऊ द्या, मग तुम्ही लढा, असा सल्ला दिला गेला आणि चक्क दीदींनी तो मानला. अभिषेक बॅनर्जींच्या घरावर धाड पडली तेव्हा त्यांनी सरकारी यंत्रणांना पूर्ण सहकार्य केले. राजकारणात चुका होतच असतात. देशातील जनता ही अल्पस्मृती असलेली आहे. तुमच्याबद्दल सध्या जनतेत रोष आहे. तसाच रोष कधीकाळी इंदिरा गांधींबद्दल होता. मात्र नंतर त्याच जनतेने इंदिराजींना सत्तासिंहासनावर बसवले. तुम्हालाही तसा फायदा होईल, हा सल्ला मिळाल्यानंतर दीदी ‘बहोत बदले बदले से लग रहे हो आप’ असे म्हणण्याइतपत बदलल्या आहेत हेच खरे!