सामना अग्रलेख – साठ वर्षांचा झंझावात!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिवसेनेने जसे ‘मराठी’ वारे सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यांत घुमवले, तसे हिंदुत्वाचे शंखध्वनी फुंकून समस्त हिंदू समाजाला जाग आणली. लढा मलंगगडाचा असेल नाहीतर अयोध्येचा, हिंदुत्वाच्या महायज्ञात शिवसेनेने जितक्या समिधा टाकल्या, तेवढे कार्य आताच्या नकली हिंदुत्ववाद्यांनी केले आहे काय? जसे छत्रपती शिवरायांच्या बाबतीत म्हटले जाते की, शिवराय नसते तर हिंदूंची सुंताच झाली असती. तेच कार्य शिवसेनाप्रमुखांनी पुढे नेले, पण देशातील अखंडता कायम ठेवून. राष्ट्र आधी हा मंत्र शिवसेनेने कायम ठेवला. त्या मंत्राचा जागर सुरूच आहे, सुरूच राहील. शिवसेना अमर आहे! अमर आहे!!  

बाळ केशव ठाकरे या धारदार कुंचल्याच्या व्यंगचित्रकाराने जगाच्या राजकारणात चमत्कार घडवला. त्या चमत्काराचे नाव शिवसेना. शिवसेना स्थापनेच्या ऐतिहासिक कार्यास 60 वर्षे झाली आहेत. या काळात शिवसेनेने हल्ले सहन केले, जय-पराजय पाहिले, सर्व प्रकारचे हलाहल पचवून हिमालयातील नीळकंठाप्रमाणे शिवसेना उभीच आहे. शिवसेनेस ओरबाडण्याचे, लचके तोडण्याचे प्रकार तर झालेच झाले. शिवसेनेविषयी सदैव वाटणारी भीती हेच त्यामागचे कारण. साठ वर्षांत अनेक ‘सेना’ निर्माण झाल्या व संपल्या, पण बाळासाहेब ठाकरे यांनी निर्माण केलेल्या शिवसेनेचा पाया आणि कळस कायम राहिला. तरीही व्यापारी वृत्तीच्या बनावट सेनांचा सुळसुळाट सुरूच आहे. शिवसेनेची स्थापना हा राजकीय व्यवहार कधीच नव्हता. शिवसेनाप्रमुखांनी असा व्यवहार होऊ दिला नाही. त्यामुळे वेळोवेळी अशा सौदेबाज ठेकेदारांना बाहेरचा रस्ता दाखवून शिवसेनेचा प्रवाह शुद्ध करण्यात आला. हा खळखळता प्रवाह मराठी आणि हिंदुत्वाचा विचार घेऊन आजही महाराष्ट्राच्या दऱ्याखोऱ्यांतून वाहत आहे. शिवसेना निर्माण झाली आणि महाराष्ट्राच्या पिचलेल्या मनगटात तेव्हा बळ चढले. संयुक्त महाराष्ट्राची स्थापना नुकतीच झाली होती. महाराष्ट्राच्या लढ्यात कोणतीही विशेष कामगिरी न बजावता काँग्रेसने सत्ता मिळवली. नाही म्हणायला केंद्रीय मंत्री चिंतामणराव देशमुख यांनी भर संसदेत अर्थमंत्रीपदाचा फेकलेला राजीनामा संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात विजेची सळसळ निर्माण करून गेला. यशवंतराव चव्हाणांनी संयुक्त महाराष्ट्राचा ‘मंगल कलश’ आणला. ‘‘हे राज्य मराठी माणसाचेच,’’ अशी ग्वाही दिली, पण महाराष्ट्राच्या राजधानीत, मुंबईत मराठी माणसास मानसन्मान मिळू नये यासाठी चोख बंदोबस्त व्यापार मंडळाने केला होता. मुंबईत उपऱ्यांनी यायचे, त्यांचे इमले बांधायचे, पैसाअडका कमवायचा, नोकऱ्या हडप करायच्या आणि मराठी माणसाला त्याच्याच मालकीच्या मुंबईत उपरा ठरवायचे. हे पाहिल्यावर शेवटी यशवंतराव चव्हाणांनाही त्याची खंत व्यक्त करावी लागली की, ‘‘महाराष्ट्रात मुंबई आहे, पण मुंबईत महाराष्ट्र दिसत नाही.’’ हे असे विदारक चित्र दूरदृष्टीच्या बाळासाहेब ठाकरे यांनी आधीच पाहिले व

शिवसेनारूपी वादळ

मुंबईच्या रस्त्यावर उतरवून मराठीद्वेष्ट्यांना ‘दे माय धरणी ठाय’ करून सोडले. बाळासाहेब एक वादळच होते. त्यांनी विचारांचे वादळ लेखणी, वाणी आणि कुंचल्याच्या फटकाऱ्यांतून निर्माण केले. त्या वादळाच्या निशाण्या आजही जागोजाग उभ्या आहेत. शिवसेनेमुळे खवळलेल्या जनसागराचे उग्र स्वरूप हिंदुस्थानास अनेकदा दिसले. बाळासाहेब त्या उग्र जनसागराचे महानायक होते. केवळ शब्दांतून दरारा निर्माण करण्याची त्यांची शक्ती खरोखरच असामान्य होती.

‘खिंचो न कमान को,

न तलवार निकालो;

जब तोप मुकाबिल हो,

तो अखबार निकालो’

अशी बिरुदावली भाळी मिरवत ‘मार्मिक’चा जन्म झाला तोच मुळी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची सिद्धता झाल्यावर. मुंबईच्या मराठी माणसाची ती धग, ती तडफड, तो असंतोष ‘मार्मिक’मध्ये प्रकट झाला. ‘मार्मिक’मधील भेदक व्यंगचित्रांमार्फत ‘ठाकरे’ मराठी माणसाला पेटवू लागले. ‘मार्मिक’ मराठी माणसाचा आत्मा झाला व शेवटी क्रांतीची ठिणगी पडली. शिवसेना पेटत्या मशालीसारखी भडकत राहिली. तरीही ‘शिवसेनेने 60 वर्षांत काय केले?’ असा प्रश्न विचारणारे महाभाग आजही सापडतात. दुर्दैवाने ते मराठीच असतात. ‘शिवसेनेने काय केले?’ असे विचारणे म्हणजे आपल्याच आईला ‘‘खरंच तू माझी आई आहेस ना?’’ असे विचारण्यासारखे आहे. शिवसेनेने मराठी माणसाला मराठी म्हणून स्वाभिमानाने उभे राहायला शिकवले. ‘‘ही मुंबई माझी आहे,’’ हा आत्मविश्वास मराठी मनात आणि मनगटांत निर्माण केला. नगरपित्याचे नगरसेवक केले. शाखाशाखांचे जाळे उभे करून एक प्रकारे लोकांची हक्काची कुटुंब न्यायालये निर्माण केली. नळावरील भांडणांपासून शाळा, कॉलेजची ऍडमिशन्स, रुग्णसेवा, रेशनकार्ड अशी रोजची कामे शिवसैनिक तेथे बसून करू लागले. कुठे अन्याय दिसला की, धाव त्या ठिकाणी.

समाजसेवेचे रूपच

शिवसेनेने बदलले. अपघात घडला, बॉम्बस्फोट झाले की, मदतीस शिवसैनिक धावलाच म्हणून समजा. रक्तदान शिबिरे, शिक्षणविषयक उपक्रम, आरोग्य शिबिरे, मोफत पुस्तक-वह्या वाटप अशा विविध उपक्रमांतून शिवसेना घराघरांत पोहोचली. शिवसेना कामगार-कष्टकऱ्यांचा आधार बनून निःस्वार्थ भावनेने काम करीत राहिली. शिवसेनाप्रमुखांच्या वाढदिवशी तर सामाजिक उपक्रमांना बहार येत असे. अशा या शिवसेनेने पालिका जिंकल्या. विधानसभा, लोकसभा जिंकली. सत्तेच्या माध्यमातून लोकसेवेचा डोंगर उभा केला. सामान्यांतल्या सामान्य माणसाला आमदार, खासदार, मंत्री बनवण्याचा चमत्कार शिवसेनाच करू शकली. शिवसेना म्हणजे महाराष्ट्राच्या वैभवाचा कळस ठरली. तो कळस कापून महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा पदर खेचण्याचा अट्टहास गेल्या काही काळापासून सुरू आहे. शिवसेनेला आतापर्यंत अनेकांनी तडे देण्याचा प्रयत्न केला. अगदी शिवसेनेच्या स्थापनेपासून महत्त्वाकांक्षेच्या पोटदुखीने बेजार झालेल्यांनी शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसले व हे सर्व घाव झेलून शिवसेना इथपर्यंत आली. हे सर्व घाव पाठीवरच झाले. समोरून येऊन घाव घालण्याची हिंमत एकातही नव्हती. शिवसेनाप्रमुखांनी एकदा कळवळून सांगितले होते, ‘‘माझ्या पाठीवर इतके घाव पडले आहेत की, नवीन घाव झेलायला पाठीवर जागाच उरली नाही.’’ हीच वेदना घेऊन शिवसेना साठीत पोहोचली आहे. या प्रवासात जशी निष्ठावंतांची फौज उभी राहिली तसे काही बनचुके, लाचार व बेइमानही उभे राहिले. त्यांनी स्वार्थ साधून पळ काढला. राजकारणातले सत्त्व आणि नीतिमत्ता संपली त्याचेच हे लक्षण. शिवसेनेने जसे ‘मराठी’ वारे सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यांत घुमवले, तसे हिंदुत्वाचे शंखध्वनी फुंकून समस्त हिंदू समाजाला जाग आणली. लढा मलंगगडाचा असेल नाहीतर अयोध्येचा, हिंदुत्वाच्या महायज्ञात शिवसेनेने जितक्या समिधा टाकल्या, तेवढे कार्य आताच्या नकली हिंदुत्ववाद्यांनी केले आहे काय? जसे छत्रपती शिवरायांच्या बाबतीत म्हटले जाते की, शिवराय नसते तर हिंदूंची सुंताच झाली असती. तेच कार्य शिवसेनाप्रमुखांनी पुढे नेले, पण देशातील अखंडता कायम ठेवून. राष्ट्र आधी हा मंत्र शिवसेनेने कायम ठेवला. त्या मंत्राचा जागर सुरूच आहे, सुरूच राहील. शिवसेना अमर आहे! अमर आहे!!