
हिंदुत्व आणि मराठी माणसांसाठी अखंड युद्ध छेडणाऱया लढवय्या अस्सल शिवसेनेचा उद्या साठावा वर्धापन दिन आहे. शीव येथील षण्मुखानंद सभागृहात यानिमित्त दणदणीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मार्गदर्शन करणार आहेत. सहा खासदारांनी पक्षाचा व्हीप नाकारून गद्दारी केल्याची घटना ताजी असताना उद्धव ठाकरेंचा आसुड कसा कडाडतो याकडे साऱयांचे लक्ष लागले आहे. यावेळी ‘दंगल’ कवितेसाठी प्रसिद्ध असलेले विख्यात कवी नितीन चंदनशिवे आणि प्रसिद्ध स्टँडअप कॉमेडियन मंदार भिडे यांच्या कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले आहे.
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसाच्या न्याय्य हक्कांसाठी 19 जून 1966 रोजी शिवसेनेची स्थापना केली. महाराष्ट्राची अस्मिता जोपासतानाच शिवसेनेने तमाम हिंदूंच्या नसानसांत धर्माभिमान जागृत केला. शिवसेनाप्रमुखांचे जन्मशताब्दी वर्ष आणि शिवसेनेचा हीरक महोत्सव असा योग यंदाच्या वर्धापन दिनाला आहे. या सोहळय़ाला शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्यासह सर्व नेते उपस्थित राहणार आहेत.
- प्रसिद्ध व्याख्याते व शिवसेना उपनेते नितीन बानगुडे-पाटील यांचे ‘भगवा’ या विषयावर व्याख्यानही यावेळी होणार आहे.
लॉजिस्टिक प्रशिक्षणातील यशवंतांना प्रमाणपत्रे
शिवसेनाप्रमुखांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त लॉजिस्टिक क्षेत्रात मराठी तरुणांना रोजगाराचे नवे दालन उपलब्ध करून देण्यासाठी ‘शिवसेना भवन’ येथे प्रशिक्षण वर्ग राबवण्यात आले होते. प्रशिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना उद्धव ठाकरे यांच्या हस्ते प्रमाणपत्रे प्रदान केली जाणार आहेत.
सदस्य नोंदणीचा शुभारंभ
सन 2026 ते 2028 या दोन वर्षांसाठी शिवसेना प्राथमिक सदस्य नोंदणीचा शुभारंभ या सोहळय़ात उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे. उद्धव ठाकरे स्वतः पहिला अर्ज भरून त्याची सुरुवात करणार असून नंतर राज्यभरात हे अभियान राबवले जाणार आहे.
‘दंगल’फेम चंदनशिवे यांच्या कविता
हा सोहळा प्रबोधन आणि मनोरंजनाचा अनोखा संगम ठरणार आहे. ‘दंगल’ आणि ‘आमचा कांबळे’सारख्या धारदार आणि ज्वलंत कवितांनी महाराष्ट्रभरात पोहोचलेले प्रसिद्ध कवी नितीन चंदनशिवे यांच्या कवितांचा कार्यक्रम यावेळी रंगणार आहे.
स्टँडअपवाल्या भिडेंचा हास्यकल्लोळ प्रसिद्ध स्टँडअप
कॉमेडीयन मंदार भिडे यांनी खुसखुशीत आणि राजकीय टोलेबाजीने हास्यकल्लोळ केला आहे. त्यांचे शो तुफान गाजत आहेत. देशात आणि विदेशात त्यांनी 800 हून अधिक शो केले. हास्याचे स्फोट घडवणाऱया याच टोलेबाजीचा आस्वाद उद्या घेता येणार आहे.
स्थळ – षण्मुखानंद सभागृह, माटुंगा
वेळ – सायंकाळी 5.30 वाजता

























































