
मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ उद्या शिवरायांच्या जयघोषाने दुमदुमणार आहे. शिवसेनेच्या स्थानीय लोकाधिकार समिती महासंघाच्या प्रयत्नाने विमानतळावर मेघडंबरीसह छत्रपती शिवाजी महाराज यांचा नवा पुतळा उभा राहिला. त्याचे अनावरण शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्या होणार आहे.
मागील १९८७ पासून सांताक्रूझ येथील इंडियन एअरलाइन्स परिवहन विभागाचे कामगार शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करीत होते. पण जानेवारी २०२४ रोजी विमानतळाच्या विकासाच्या नावाखाली कोणालाही विश्वासात न घेता विमानतळ परिसरातील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा प्रशासनाने अचानक हलवून अज्ञातस्थळी ठेवला. ही बाब एअर इंडिया स्थानीय लोकाधिकार समितीचे पदाधिकारी प्रशांत सावंत, उल्हास बिले, प्रवीण शिंदे यांच्या निदर्शनास आल्यावर त्यांनी पुतळ्याचा शोध घेतला असता, पुतळा कोणाच्याही हाती लागणार नाही अशा जागेत सापडला. स्थानिक शिवप्रेमी आणि कामगारांनी ही घटना त्वरित लोकाधिकार महासंघाचे अध्यक्ष, खासदार अनिल देसाई यांच्या निदर्शनास आणून दिली. देसाई यांनी कार्यकर्त्यांशी मुजोरी करणाऱ्या ठेकेदाराचा शोध घेऊन ‘मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेड’ या कंपनीला जाब विचारला. कंपनीच्या विरोधात पोलीस ठाण्यात रीतसर तक्रार करून लोकाधिकार महासंघाचे सरचिटणीस प्रदीप मयेकर व कार्याध्यक्ष विलास पोतनीस, आमदार सुनील शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन केले गेले.
लोकाधिकारच्या प्रयत्नाने छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा मूळ ठिकाणी बसविण्यात आला व पुन्हा पुतळा हलविला जाणार नाही याची समज प्रशासनाला देण्यात आली. पण मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेड कंपनीच्या व्यवस्थापनाने जागेचे महत्त्व ओळखून अनिल देसाई यांच्याशी संपर्क साधला आणि पुतळा भव्यदिव्य स्वरूपात मेघडंबरीसह सहार येथील एअर इंडिया गेट क्र. ५, जी.एस.डी. सहार पोलीस स्टेशनजवळ बसवण्याचे आश्वासन दिले.
मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट लि. व्यवस्थापनाने दिलेल्या आश्वासनाप्रमाणे, नवीन ब्रॉन्झपासून बनविलेल्या मेघडंबरीसह छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे उद्घाटन उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शनिवार, २० जून रोजी दुपारी १२ वाजता होणार आहे. या उद्घाटन सोहळ्यास सर्वांनी उपस्थित राहावे, असे आवाहन लोकाधिकार समिती महासंघाच्या वतीने सरचिटणीस प्रदीप मयेकर यांनी या प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.



























































