
विदेशातील शिपिंग कंपनीत नोकरीचे आमिष दाखवून अनेक बेरोजगार तरुणांना तब्बल १ कोटी ७३ लाख ८१ हजारांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी खारघर येथील अव्हॉन नेव्हिगॉर्झ मरीन्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खारघर पोलिसांनी या प्रकरणाचा कसून तपास सुरू केला आहे.
खारघर सेक्टर ७ येथे कंपनीचे कार्यालय आहे. या कार्यालयातून मलेशिया तसेच इतर देशांमध्ये शिपिंग क्षेत्रात नोकरी मिळवून देण्याचे आश्वासन दिले जात होते. नोकरीसाठी सर्व्हिस चार्ज, व्हिसा प्रक्रिया, विमान तिकीट व इतर खर्चाच्या नावाखाली बेरोजगार तरुणांकडून मोठ्या प्रमाणात रक्कम उकळण्यात आल्याचा आरोप तक्रारदारांनी केला आहे. बेरोजगार तरुणांनी कंपनीतील प्रतिनिधींच्या सांगण्यावरून विविध बँक खात्यांमध्ये टप्प्याटप्प्याने पैसे जमा करण्यात आले. मात्र पैसे भरल्यानंतरही नोकरी, व्हिसा किंवा परदेश प्रवासाबाबत कोणतीही ठोस माहिती देण्यात येत नसल्याचे लक्षात आल्यानंतर आपली फसवणूक झाली असल्याचे तरुणांना समजले.
भिवंडीतील कंपनीवर एफडीएची कारवाई
अन्न व औषध विभागाच्या आयुक्तपदी तुकाराम मुंढे यांच्या नियुक्तीनंतर अनेकांनी धसका घेतला आहे. तालुक्यातील दापोडे भागात सिग्मा लाईफस्टाईल या कारखान्यामध्ये विनापरवाना सौंदर्यप्रसाधनांच्या कंपनीवर पथकाने छापा टाकला. कारवाईत १ कोटी २३ लाख १३ हजार ३९३ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. यामध्ये लहान मुलांसाठी वापरले जाणारे साबण, शॅम्पूचा समावेश आहे. नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एमडी ड्रग्जच्या अड्ड्यावर छापा
मीरा-भाईंदर पोलिसांनी अत्यंत कौशल्याने तपास करत उत्तर प्रदेश व तेलंगणा राज्यात जाऊन एमडी ड्रग्ज तयार करणारे कारखाने उद्ध्वस्त केले. याप्रकरणी आतापर्यंत २० आरोपींना अटक करत एकूण २२ कोटी ७९ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. त्यामध्ये ड्रग्ज बनवण्यासाठी लागणारे ३०० लिटर रसायन व २ किलो ३०० ग्रॅम एमडी पावडरचा समावेश आहे. मीरा-भाईंदर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखा – ४ च्या पोलिसांनी ४ एप्रिल रोजी मीरा रोडमध्ये राहणाऱ्या महिला फिरदोस कुरेशी यांच्या घरातून १ किलो ३२४ ग्रॅम वजनाचे २ कोटी ६६ लाख ७७ हजार २८० रुपये किमतीचा एमडी ड्रग्ज जप्त केला होता. याप्रकरणी पोलिसांनी एकूण १८ आरोपींना अटक केली. त्यात मुंबईतील आगरीपाडा, मालवणी, मनोरी व तेलंगणा राज्यातील एमडी ड्रग्ज तयार करण्यासाठी उभारलेली फॅक्टरी व त्यासाठी लागणारे केमिकल असा २० कोटी ७२ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
ऑनलाइन गेमिंगच्या नादात गमावले १ कोटी
घरबसल्या करोडपती होण्याच्या नादात एका २५ वर्षीय तरुण रिक्षाचालकाने तब्बल १ कोटी २६ लाख ८६ हजार गमावल्याची खळबळजनक घटना उलवेमध्ये उघडकीस आली आहे. या तरुणाला सायबर टोळीने ऑनलाइन गेमिंगमध्ये अडकवून त्याच्याकडून रक्कम उकळली. याप्रकरणी नवी मुंबई सायबर पोलिसांनी अज्ञात सायबर टोळीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.




























































