
>> अजित कवटकर
भौतिकवाद, भ्रष्टाचार, स्वार्थ ही आजच्या पर्यावरणाला मारक ठरलेल्या अनेक कारणांमधील प्रमुख कारणे आहेत. आधुनिकता, विकास प्रगतीच्या सबबीखाली भौतिकवादाला आणि चंगळवादाला आज लाभत असलेले प्रोत्साहनच पर्यावरणाच्या मुळांवर उठले आहे. पर्यावरणस्नेही प्रगती व विकास हा पर्याय उपलब्ध असूनदेखील त्याला बगल देत आजही पर्यावरणघातक प्रक्रिया व प्रणालींनाच स्वीकारले जात आहे. बहुतांश पर्यावरणस्नेही तंत्रज्ञान हे काही प्रमाणात महाग आहेत, हे सत्य आणि ते जोपर्यंत स्पर्धात्मक किमतींवर उतरत नाहीत तोपर्यंत त्यांचा स्वीकार बहुसंख्य जनांकडून झालेला दिसणार नाही. यामुळे वातावरण अधिक बिघडतच जाणार आहे.
गेल्या काही दशकांपासून तापमानवाढ ही जागतिक स्तरावरील एक स्थायी समस्या झाली आहे. तथापि तिची तीव्रता व गांभीर्य हे यंदाच्या उन्हाळ्यापासून अधिक जाणवते आहे. इतके की, ही उष्णता अनेक आपत्तींना कारणीभूत ठरत संपूर्ण अर्थव्यवस्थेला, समाज व्यवस्थेला तडाखा देत आहे. त्याची झळ कमी अधिक प्रमाणात प्रत्येकाला बसणार याची खात्री आता शासनकर्त्यांनादेखील झाली आहे.
तापमानवाढ, हवामान बदल वगैरेंसारख्या समस्यांवर मागील अनेक दशकांपासून विचार मंथन, जनजागृती, उपाययोजना सुरू आहेत, परंतु आजपर्यंतची ही उठाठेव ‘पालथ्या घड्यावर पाणी’ ठरलीं आहे. त्यातून काही सकारात्मक बदल घडवून आणले गेले तर नाहीच, उलट पर्यावरणाचा अधिक ऱहास झालेला मात्र प्रकर्षाने दिसतो. या समस्येच्या निवारणाबाबत एवढी उदासीनता का? त्याकडे इतके जाणीवपूर्वक दुर्लक्ष का केले जात आहे ? आजच्या दयनीय पर्यावरणीय परिस्थितीला कारणीभूत कारणांना पुनः पुन्हा का गिरवले जात आहे?
भौतिकवाद, भ्रष्टाचार, स्वार्थ ही आजच्या पर्यावरणाला मारक ठरलेल्या अनेक कारणांमधील प्रमुख कारणे आहेत. आधुनिकता, विकास प्रगतीच्या सबबीखाली भौतिकवादाला आणि चंगळवादाला आज लाभत असलेले प्रोत्साहनच पर्यावरणाच्या मुळांवर उठले आहे. पर्यावरणस्नेही प्रगती व विकास हा पर्याय उपलब्ध असूनदेखील त्याला बगल देत आजही पर्यावरणघातक प्रक्रिया व प्रणालींनाच स्वीकारले जात आहे. बहुतांश पर्यावरणस्नेही तंत्रज्ञान हे काही प्रमाणात महाग आहेत, हे सत्य आणि ते जोपर्यंत स्पर्धात्मक किमतींवर उतरत नाहीत तोपर्यंत त्यांचा स्वीकार बहुसंख्य जनांकडून झालेला दिसणार नाही. यामुळे वातावरण अधिक बिघडतच जाणार आहे.
पर्यावरण संवर्धनासाठी आवश्यक स्वयंस्फूर्तीचा, स्वप्रेरणेचा आणि सामाजिक जबाबदारीचा अभाव असणाऱ्या अशा परिस्थितीत मग सरकार – शासनाकडून पर्यावरण संवर्धन, समाज सुरक्षा व कल्याणाच्या उपाययोजनांची अंमलबजावणी होणे अपेक्षित असते, परंतु कर्तेकरवितेच जर याबाबतीत बेफिकीर, असंवेदनशील आणि आलेल्या दिवसापुरताच विचार करणारे असतील तर मग काय बोलायचे?
पर्यावरणाला सर्वात हानीकारक ठरणाऱ्या हलक्या प्लॅस्टिकवर बंदी आणण्याच्या गोष्टी पिढ्यान्पिढ्या केल्या जात आहेत, पण हे करणे सरकारला आजतागायत जमलेले नाही. त्याच्या उत्पादनावरच घाव घालण्याचे सोडून हे लोकांना ‘न वापराचे’ आवाहन करत आहेत. म्हणजे उत्पादकांनी उत्पादन करत राहावे. मात्र लोकांनी ते न वापरण्याची जागरूकता दाखवावी. सरकारच्या या ‘शेखचिल्ली’ धोरणामुळे आजही शहरांमध्ये पावसाळ्यात रस्त्यांवरून नद्या वाहतात, कचऱ्याचे ढिगारे सर्वत्र साचतात.
जीवाश्म ऊर्जेचा वापर व प्रभाव कमी करण्यासाठी पर्यावरणस्नेही हरित ऊर्जा निर्मितीसाठी जी युद्धपातळीवरील घाई व अट्टाहास दिसणे अपेक्षित आहे, ते दिसत नाहीत ही वास्तविकता आहे. स्वार्थ, भ्रष्टाचार, आपमतलबीपणा हे याला मोठे अडसर ठरत आहेत. इमारतीच्या दर्शनी भागावर काचा लावण्याचे स्थापत्य क्षेत्रातील नवीन फॅड हे वातावरणाला कमालीचे गरम करत आहे. अशा परिस्थितीत लोकांना एसीशिवाय पर्याय उरत नाही आणि त्यातून वाढणारा ऊर्जेचा वापर आणि मागणी ही वातावरणात अधिक हरितगृह वायू उत्सर्जित करते, ज्यातून तापमानवाढ होते. अशा अनेक गोष्टींवर सरकारने प्रतिबंधात्मक उपाय करणे आवश्यक नाही का?
झाडं तोडणं हा अपराध आहे, परंतु बांधकाम क्षेत्राला मात्र याबाबतीत अभय दिले गेल्याचे दिसते. त्यांच्या प्रोजेक्ट परिसरात ‘अडसर’ ठरू पाहणारे वृक्ष मुळापासून उखडून फेकताना ते मागेपुढे पाहत नाहीत. शहरांमध्ये आज अनियोजित पद्धतीने एकाच वेळेला सर्वत्र ज्या गतीने कन्स्ट्रक्शन कामं सुरू आहेत ती पाहता किती हजार झाडे बळी गेली असतील याची गणतीदेखील करता येणार नाही. तोडलेल्या झाडांच्या बदल्यात अन्यत्र अनेक पटींनी वृक्षारोपण करण्याच्या नियमांचे आजपर्यंत कोणी पालन केले आहे का? रहदारीच्या सुरक्षेसाठी रस्त्याच्या कडेवरील झाडांच्या धोकादायक फांद्या कापताना झाड ‘ट्रिम’ नाही, तर त्याला अक्षरशः संपवून टाकतात. इथे कधीकाळी एक झाड होतं याचा पुरावा देण्यासाठी मग बहुधा त्याचा मरणावस्थेत गेलेला बुंधा तेवढा शाबूत ठेवतात. वनांसाठीच्या राखीव जमिनींवरील आरक्षणदेखील रद्द करून तेथील वन्य जीव संपत्तीचं होत्याचे नव्हते करण्याचे घाट घातले जात असल्याच्या बातम्या कीव करायला लावणाऱ्या आहेत. जागेच्या कमतरतेमुळे गगनाला भिडलेल्या जमिनींच्या किमती पाहता झाडं कापून, जंगलं तोडून जागा निर्माण करण्याचा धंदा जोमात सुरू आहे. ही असली विध्वंसक विकास मानसिकता बाळगणारे, निर्वनीकरणाला खत-पाणी घालणारे आजच्या स्पर्धेत स्वतःच्या मोठेपणासाठी पर्यावरणाच्या थडग्यावर स्वतःच्या पोकळ कर्तृत्वाचे झेंडे उभारतात. जीवनाला चालना देणारी पंचमहाभूते आज प्रदूषित, विषारी होऊन स्वतः आजारी दिसत आहेत. त्यामुळे पुढे हे जग जगण्यायोग्य उरणार नाही आणि याच्या पाऊलखुणा आताच दिसू लागल्या आहेत.
नेते, अधिकारी तसेच नैसर्गिक संसाधनं बरबाद करून स्वतः सधन झालेले व्यावसायिक आपल्या फार्म हाऊसवर, गावाकडील घर – शेताभोवती गर्द हिरवळीची दाटी करतात. कशासाठी? स्वास्थ्यासाठी, उत्तम आरोग्यासाठी, मनःशांतीसाठी, पशुपक्ष्यांच्या सहवासासाठी… म्हणजे विकासाच्या नावाखाली एकीकडे निर्वनीकरण, काँक्रिटीकरण, वाळवंटीकरण करून लोकांचे हाल हाल करायचे, पण दुसरीकडे स्वतःचे खासगी नंदनवन मात्र फुलवत बसायचे. ही वृत्ती आज विकृती बनून पर्यावरणाला, निसर्गाला त्रासदायक ठरत आहे. केलेली वाईट कर्मे कालांतराने का होईना, पण आपल्यावर उलटतातच हे धर्मसत्य आज बिघडलेल्या परिस्थितीतून साक्षात्कार घडवत आहे. कमी पर्जन्य, दुष्काळ, कमी उत्पादन, बेरोजगारी, आर्थिक मंदी, अस्वस्थता, अराजकता या दुर्दैवी साखळीची शक्यता बोलली जात आहे. वाईट याचे वाटते की, कर्मे कुणाची आणि भोगणार कोण? भ्रष्टाचार करून, पैसा कमवून जे यंदाच्या प्रचंड उष्णतामानासाठी जबाबदार आहेत ते स्वतःच्या घरात सुरक्षित राहतील. उघड्यावर पडणार ती सामान्य जनता. यंदाच्या प्रचंड वाढलेल्या उष्णतेबाबत हेच म्हणावे लागेल. यावेळी वाढलेल्या प्रचंड उष्म्याचे खापर ‘अल निनो’वर शेकवून आणि त्याआड आपली पापं दडवून ही मंडळी आपण नामानिराळी राहणार असली तरी प्रत्येक जीव जाणतो की, आजच्या उष्णतेची आग समाजातील बेपर्वा मंडळींनी लावली आहे. सरकारकडून पर्यावरणस्नेही पद्धतीने विकास करण्यासाठीच्या कार्यपद्धती रुजवणे अपेक्षित आहे, परंतु निसर्गाला दुर्लक्षून, अव्हेरून चाललेला सत्ताधाऱ्यांचा पर्यावरणद्रोही अतिरेक संपूर्ण विकासालाच उद्ध्वस्त करेल ही भीती अतिशयोक्ती नाही. नैसर्गिक आपत्ती किती भयानक विध्वंस करू शकतात, हे वेळोवेळी अनुभवले आहे. त्यातच पृथ्वीने जर मानवाच्या अयोग्य, असंयमी, असंवेदनशील कृती अशा आपत्तींना उत्तेजित करून रुद्रावतार धारण करण्यास मजबूर करत असतील तर येणाऱ्या संकटांना जबाबदार कोण?


























































