Ahilyanagar News ब्राह्मण गल्लीत मांस फेकणारी बुरखाधारी महिला निघाली हिंदू ! मास्टरमाइंडचा शोध घेण्याची मागणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बकरी ईदच्या दिवशी अहिल्यानगर शहरातील माळीवाडा परिसरात ब्राह्मण गल्लीत मांस फेकून धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न झाला होता. पोलिसांनी तांत्रिक कौशल्याने ‘त्या’ बुरखाधारी महिलेचा शोध घेऊन बेड्या ठोकल्या. आरोपी महिलेचे नाव स्वाती विक्रम भोसले (३९, रा. कामरगाव) असे आहे. शहरातील वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करणाऱ्या या षडयंत्रामागचा मास्टरमाइंड कोण याचा शोध पोलिसांनी घ्यावा, अशी मागणी सर्व स्तरांतील नागरिकांकडून होत आहे. १५ दिवसांपूर्वी ब्राह्मण गल्लीत एका मंगल कार्यालयासमोर रात्रीच्या वेळी मांस टाकण्यात आल्याची घटना समोर आल्याने शहरात खळबळ उडाली होती. सोशल मीडियावर याबाबत चर्चा सुरू झाली होती. पोलिसांनी परिसरात बंदोबस्त वाढविला आणि नागरिकांना संयम राखण्याचे आवाहन केले होते. धार्मिक भावना भडकवून शहरात जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न लक्षात घेता, कोतवाली पोलिसांनी कौशल्याने तपास सुरू केला. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक माहिती गोळा केली. अनेकांची चौकशी केली. १० दिवसांच्या तपासानंतर मांस फेकणाऱ्या ‘त्या’ बुरखाधारी महिलेचा शोध अखेर पोलिसांना लागला. पोलिसांनी स्वाती भोसले हिला अटक केली.

षडयंत्र असेल तर पर्दाफाश झालाच पाहिजे ! – शिवसेना

शिवसेनेचे अहिल्यानगर महानगरप्रमुख किरण काळे यांनी आरोपीचा शोध लावणाऱ्या कोतवाली पोलिसांचा सत्कार करून अभिनंदन केले. ‘पोलिसांनी अवघ्या १० दिवसांत तपास करून आरोपीचा शोध घेतला हे कौतुकास्पद आहे. मात्र, या घटनेमागील संपूर्ण सत्य बाहेर आले पाहिजे. शहरात जातीय दंगली, द्वेषाचे राजकारण, समाजात विष पेरणारे नकोत, तर शहरात शांतता आणि सामाजिक सलोखा राहिला पाहिजे. त्यामुळे पोलिसांनी आरोपी महिलेच्या केवळ कबुलीजबाबावर थांबू नये. या घटनेमागे कोणते षडयंत्र असेल तर त्याचा पर्दाफाश करावा. यामागे कोणाचा राजकीय हेतू होता का हे तपासावे,’ अशी मागणी किरण काळे यांनी केली आहे.