
>> वर्णिका काकडे
झाडीबोली ही महाराष्ट्राच्या पूर्व विदर्भातील भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिह्यांमध्ये बोलली जाणारी मराठी भाषेची एक समृद्ध प्रादेशिक बोली आहे. या चार जिह्यांचा भूभाग ‘झाडीमंडळ’ किंवा ‘झाडीपट्टी’ या नावाने ओळखला जातो. या प्रदेशात बोलली जाणारी मराठी भाषेची बोली ‘झाडीबोली’ या नावाने प्रचलित आहे. या चार जिह्यांशिवाय या जिह्यांच्या उत्तर व पूर्व सीमेवरील मध्य प्रदेशातील बालाघाट, दुर्ग व राजनांदगाव या जिह्यांचा काही भाग आणि भंडारा व चंद्रपूर जिह्यांच्या पश्चिम सीमेवरील नागपूर जिह्याचा काही भाग यांचा झाडी भाषिक प्रदेश म्हणून समावेश करावा लागतो.
या बोलीची काही प्रमुख वैशिष्टय़े आहेत. लोकसाहित्य व संस्कृतीत झाडीबोलीत लोकगीते, रोवणीची गाणी, बिरवे, गोंधळ आणि ‘दंडार’ व ‘खडीगंमत’ यांसारखे लोककला प्रकार अत्यंत प्रसिद्ध आहेत. भाषातज्ञांच्या मते, ही बोली केवळ मराठीचे एक रूप नसून तिचे स्वतंत्र व्याकरण आणि वेगळी शब्दसंपदा आहे.
या भाषेचे उच्चार व अर्थ वैशिष्टय़पूर्ण आहेत. प्रमाण मराठी आणि झाडीबोली यांच्यातील उच्चार आणि शब्दांचे अर्थ यांत लक्षणीय फरक आढळतो. तसेच अनेक शब्द प्रमाण मराठीच्या अगदी उलट अर्थानेही वापरले जातात. या भाषेचा लहेजा (उच्चार) अतिशय गोड आणि श्रवणीय आहे. लोकसाहित्यात या बोलीत क्रीडागीते, पाळणागीते, सासुरवाशिणीची गीते, रोवण्याची गाणी (शेतीची गाणी) आणि भुलाबाईची गीते यांसारखे विविध काव्यप्रकार असढळतात. डॉ. हरिश्चंद्र बोरकर यांनी झाडीबोलीवर सखोल संशोधन केले आहे आणि त्यांनी ‘झाडी मराठी शब्दकोश’ही लिहिला आहे. या भाषेतून अनेक पुस्तके, कविता आणि कथा प्रकाशित झाल्या आहेत.
झाडीपट्टी रंगभूमी ही आपले वेगळेपण जपत कार्यशील आहे. या रंगभूमीने हजारो कलावंत घडवले आहेत. या झाडीपट्टी प्रदेशात जवळपास पन्नास नाटय़मंडळे असून, येथे दोनशेहून अधिक नाटकांचे लिखाण झाले आहे. सुगीच्या हंगामात दिवाळीनंतर शेतातील पीक हाती आले की, येथील नाटकांना प्रारंभ होतो. झाडीपट्टी रंगभूमीवर लोककथा, लोकगीते, दशावतार, लळीत, खडीगंमत, दंडार, दंडीगान, गोंधळ, कळसूत्री बाहुल्यांचे खेळ, कीर्तने, भारुड, वासुदेव, तमाशे, वग, विविध नृत्यप्रकार असून, चित्र-शिल्प यासारख्या अनेक लोककलांच्या माध्यमातून लोकरंजनाचे कार्य सुरू असते.
























































