
प्रसिद्ध संगीतकार लावणीसम्राट वसंत पवार यांच्या जन्मशताब्दी वर्षारंभाचे औचित्य साधून त्यांच्यासह वसंत प्रभू आणि वसंत देसाई या दोन दिग्गज संगीतकारांच्या अजरामर गीतांना उजाळा देणारा ‘वसंत बहार – मराठी भावसंगीतातील वसंत ऋतू’ हा कार्यक्रम मंगळवारी रसिकांच्या तुडुंब गर्दीत झाला. याच दिवशी वसंत देसाई यांची जयंती असल्याने दुग्धशर्करा योग जुळून आला. या तिन्ही वसंतांनी आपल्या प्रतिभेने निर्माण केलेल्या गीतांची पर्वणी प्रेक्षकांना मिळाली.
राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभाग आणि सांस्कृतिक कार्य संचालनालयाने ‘वसंत बहार’ चे आयोजन केले होते. विलेपार्ले येथील मास्टर दीनानाथ मंगेशकर नाटय़गृहात कार्यक्रम रंगला. सांस्कृतिक कार्य मंत्री आशीष शेलार यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाचे उद्घाटन कार्यक्रम अधिकारी नीलेश धुमाळ, नाटय़निर्माते अजय विचारे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी वसंत देसाई यांचे नातू शैलेश देसाई यांना विशेष आमंत्रित होते. वसंत देसाई यांचे पणतू नचिकेत देसाई यांच्यासह गायिका केतकी भावे-जोशी आणि श्रद्धा वेटे-मोकाशी यांनी तीनही संगीतकारांची भावगीते, अभंग, लावण्या आणि बालगीते यांचे अप्रतिम सादरीकरण केले. कार्यक्रमाचे संगीत संयोजन प्रशांत लळित यांनी केले, तर निवेदन अनघा मोडक यांनी केले. सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी आणि संचालक श्रीयुत श्रीराम पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम झाला.






























































