वेब न्यूज – ब्युटी इंजेक्शन्सचे मायाजाल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> स्पायडरमॅन

आजच्या सोशल मीडियाच्या युगात परफेक्ट आणि ग्लोइंग दिसण्याच्या वेडापायी तरुण-तरुणी शॉर्टकट म्हणून विविध सौंदर्य केंद्रांमध्ये धाव घेत आहेत. यामध्ये सध्या इन्स्टंट गोरेपणासाठी दिली जाणारी ग्लुटाथायॉन किंवा चेहऱ्यावरील सुरकुत्या घालवण्यासाठी दिली जाणारी ब्युटी इंजेक्शन्स यांची प्रचंड क्रेझ वाढली आहे, परंतु तुम्हीही असा विचार करत असाल तर वेळीच सावध होण्याची गरज आहे. केंद्रीय औषध मानक नियंत्रण संघटनेने (CDSCO) देशपातळीवर जाहीर नोटीस काढून या अशा इंजेक्टेबल उत्पादनांवर कडक कारवाईचे संकेत दिले आहेत.

केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे की, हिंदुस्थानी कायद्यानुसार कोणतेही कॉस्मेटिक उत्पादन इंजेक्शनच्या स्वरूपात वापरण्यास कायदेशीर मान्यताच नाही. ड्रग्ज अँड कॉस्मेटिक्स ऍक्टनुसार, सौंदर्य प्रसाधने म्हणजे अशा गोष्टी ज्या शरीरावर वरून चोळल्या किंवा लावल्या जातात. जसे की क्रीम, लोशन किंवा पावडर. शरीराच्या आत सुईद्वारे थेट रक्तात टोचल्या जाणाऱ्या कोणत्याही गोष्टीला कायद्यानुसार कॉस्मेटिक मानले जाऊ शकत नाही, ती थेट औषधांच्या श्रेणीत येतात. त्यामुळे बाजारात दिली जाणारी ही इंजेक्शन्स मुळात कायद्याच्या चौकटीत बसतच नाहीत.

आजकाल अनेक अनधिकृत क्लिनिक्स आणि ब्युटी पार्लर्समध्ये कोणतेही तज्ञ डॉक्टर नसताना भपकेबाज जाहिरातींना बळी पडून ग्राहकांकडून लाखो रुपये उकळले जात आहेत. तज्ञांच्या मते, त्वचा गोरी करणाऱया ग्लुटाथायॉनच्या अतिवापरामुळे किडनी आणि यकृत खराब होण्याचा मोठा धोका असतो. अयोग्य पद्धतीमुळे त्वचेवर कायमचे डाग पडणे, इन्फेक्शन किंवा त्वचेचा कॅन्सर होऊ शकतो. चेहऱयाच्या नसा थेट मेंदू आणि डोळ्यांशी जोडलेल्या असल्याने चुकीच्या ठिकाणी सुई टोचली गेल्यास दृष्टी जाणे किंवा चेहऱ्याचा पक्षाघात होण्याचाही धोका असतो.

या गंभीर पार्श्वभूमीवर नियामक मंडळाने आता कडक पावले उचलण्यास सुरुवात केली असून नियम मोडणाऱ्यांवर थेट फौजदारी कारवाई केली जाईल. वरवरचे तात्पुरते सौंदर्य मिळवण्याच्या हव्यासापोटी स्वतःच्या जिवाशी खेळू नका, असे आवाहन सरकारने केले आहे.