जिओचा आयपीओ आज लिस्ट होणार; अंदाजित मूल्य 10.3 लाख कोटी, संपूर्ण जगाचे लागले लक्ष

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जिओ प्लॅटफॉर्म्स लिमिटेडचा आयपीओ शेअर बाजारात उद्या, 28 ऑक्टोबरला लिस्ट होणार आहे. या आयपीओचे अंदाजित मूल्य 10.3 लाख कोटी रुपये आहे. लिस्टिंग झाल्यानंतर जिओ प्लॅटफॉर्म्स लिमिटेड शेअर बाजारातील सर्वात जास्त बाजारमूल्य असलेली दूरसंचार आणि डिजिटल सेवांमधील कंपनी ठरणार आहे. तर जिओ या आयपीओच्या माध्यमातून एकूण 30 हजार 213 कोटी रुपये उभारणार आहे. आयपीओमधून मिळणाऱ्या रकमेतून 27,500 कोटी रुपयांचा वापर रिलायन्स जिओ इन्फोकॉमनचे कर्ज चुकवण्यासाठी केला जाणार आहे.

जिओ प्लॅटफॉर्म्स लिमिटेडचा आयपीओ नॅशनल स्टॉक एक्सचेंज आणि बॉम्बे स्टॉक एक्सचेंजवर 28 ऑक्टोबर 2026 ला लिस्ट होणार आहे. 10.3 लाख कोटी रुपयांच्या बाजारमूल्यामुळे हिंदुस्थानी शेअर बाजारातील सर्वाधिक बाजारमूल्य असणाऱ्या कंपन्यांच्या यादीत जिओ प्लॅटफॉर्म्स लिमिटेड चौथी कंपनी ठरणार आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज, भारती एअरटेल आणि एचडीएफसी बँकेनंतर जिओ प्लॅटफॉर्म्स लिमिटेडचा नंबर लागतो. रिलायन्स इंडस्ट्रीजचे बाजारमूल्य 16.2 लाख कोटी, भारती एअरटेल 12.2 लाख कोटी आणि एचडीएफसी बँकेचे बाजारमूल्य 10.6 लाख कोटी तर, जिओचे बाजारमूल्य 10.3 लाख कोटी असेल.

जिओचा आयपीओ 21 ते 23 ऑक्टोबरपर्यंत सब्सक्रिप्शनसाठी खुला होता. गुंतवणूकदारांनी तुफान बोली लावल्याचे पाहायला मिळाले. ग्रे मार्केट प्रीमिअमने आयपीओ 20 टक्क्यांच्या प्रीमिअमसह लिस्ट होण्याची शक्यता आहे. जर असे झाले तर जिओचा आयपीओ 1340 रुपयांना लिस्ट होऊ शकतो.