
शिक्षकांना अशैक्षणिक कामे इतकी आहेत की, गुरुजी आयोगाचे की शाळेचे की विद्यार्थ्यांचे, की सरकारचे, की संस्था चालकांचे? असे प्रश्न निर्माण झाले आहेत.शिक्षकाची भूमिका करणं व शिक्षकाची भूमिका जगणं वेगळं. यात फारकत झाल्यामुळे गुरुजी कोणाचे? हा संभ्रम आहे. क्लासमध्ये काही मुलांना जवळ करण्याचा नादात गेस पेपर सांगणारे गुरुजी लोकप्रिय, तर त्यामुळे काही असंख्य मुलांच्या गुणवत्तेवर परिणाम झाल्यामुळे काही गुरुजी नकोसे झाले आहेत.
आमच्या गुरुजींमुळे आमचे संबोध स्पष्ट झाले, आम्हाला आमचे इंग्रजीचे स्पेलिंग पाठ व्हायचे, पाढे पाठ व्हायचे असं म्हणणारी पिढी आज आहे. गुरुजी त्यांचे होते व ते गुरुजींचे होते. समाज प्रबोधनासाठी आलेली साधनं मनोरंजनात इतकी रुतली की मुलांना भवतालाचं भान राहिलं नाही. गेम्स, कार्टून, रील, एआयमुळे केवळ गुरुजींवर विद्यार्थी अवलंबून नाहीत.
अब्राहम लिंकननंतर कोणीही मुख्याध्यापकांना पत्र पाठवलं नाही की, माझ्या मुलाला हे शिकवा, ते शिकवा. परीस स्पर्श म्हणजे काय असतं हे काही शिक्षकांनी सिद्ध केलं आहे. गुरुजींमुळेच संस्कृती संवर्धन होणार आहे. काही शिक्षक आपल्यावर संस्कार करत असतात. ‘एक तरी ओवी अनुभवावी’प्रमाणे काही शिक्षक अनुभवायला हवेत. ‘भालचंद्र मुणगेकर आज आले नाहीत’ म्हणणारे शिक्षक होते म्हणून मुणगेकर घडले. आज गुरुजींना विद्यार्थी माहीत नाहीत व विद्यार्थ्यांना गुरुजी माहीत नाहीत.
‘Education is a lifelong process’ हे विसरून आपण पॅटर्नला महत्त्व देत आहोत. ‘There is no shortcut to success’ खोटं ठरवण्याच्या पद्धती विकसित होत आहेत. यशस्वी जीवन जगण्याचा कोणी विचार करत नाही. प्रत्येकाला फक्त यशस्वी पॅकेज देणारं शिक्षण हवं.
मुलांना गुरुजी नको आहेत. त्यांनी दिलेले परीक्षेतील प्रश्न हवे आहेत. पालकांनी, शिक्षकांनीही विद्यार्थ्यांना 99.9 टक्क्यांची झापडं बांधल्यामुळे त्यांना इतर काही दिसत नाही. 21 अपेक्षित, गाईड, कोचिंग हेच मुलांचे आवडते आहेत. संस्कार करणारे प्रसंगच कुटुंबात, शाळेत खंडित झाले आहेत. आजचा विद्यार्थी ज्ञानासाठी शिक्षण घेत नाही, तर स्पर्धेसाठी शिक्षण घेत आहे, शिक्षण आज आदर्शापासून फारकत घेत आहे.
शिक्षणाचे उद्देश व जगण्याचे उद्देश वेगवेगळे झाले आहेत. ज्ञानासाठी नव्हे, तर हवे तेवढेच व माहितीपुरतेच शिकायचे. मग गुरुजी हवेतच कशाला? गुगल, एआय 24 तास विद्यार्थ्यांच्या सेवेत असतात. समाजासाठी नव्हे, तर फक्त स्वतःसाठीच उपयोगी होईल यासाठी शिकायचे. पुन्हा एकदा आदर्श, मूल्ये यांची गरज निर्माण झालेली आहे व त्या दृष्टीने आदर्शाचा विचार करणे आवश्यकच बनले आहे. गुरुजी घडवू शकतात व बिघडवूही शकतात. एका चापटीत मृत्यूचा रस्ता दाखवणारेही आहेत.
आईनंतर गुरुजीच असतात, पण पैसे देऊन शिकवणीला येणाऱयांना चांगले शिकवले जाते. मग गुरुजी सर्वसामान्यांचे नाहीत का? मूल्यांचा जेव्हा ऱहास होतो तेव्हा आदर्शाची वानवा निर्माण होते. आदर्श सजीवरूपी आपल्या अवतीभवती जरी नसले तरी पुस्तकातून चांगल्या चांगल्या आदर्शाची पारायणे केली जातात व आदर्श जिवंत ठेवला जातो. ज्ञानेश्वरीची पारायणे, तुकारामाचे अभंग, रामदास बोध हे आजही अनेकांचे आदर्श आहेत व त्यांच्या जीवनाची विचार प्रणालीसुद्धा त्यांच्या प्रमाणेच ठेवून ते स्वतःला कृतकृत्य मानतात.
तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे, औद्योगिकीकरणामुळे इतकी भौतिक सुखाची रेलचेल झाली आहे की, मुलांचे आदर्श बदलले आहेत. श्यामच्या आईचे संस्कार आज पालक करू शकत नाहीत. कारण मुले कार्टून पाहत माणसांना तुच्छ समजत आहेत. पोकेमॅन, हल्क अवेंजर, स्पायडरमॅन हे त्यांचे आदर्श आहेत, जे अस्तित्वात नाहीत. स्वप्नातले आदर्श कामाला येत नाहीत, वास्तवातले आदर्शच जगणं अर्थपूर्ण करतात. मुलांसमोरच्या आभासी आदर्शामुळे मुले आज हतबल झाली आहेत. गुरुजी हा आज मुलांच्या समोरचा शेवटचा पर्याय नको. गुरुजी, तुम्ही काहीतरी करा. प्रेक्षक म्हणून तुम्ही आम्हाला नको आहात, तर आदर्श शिक्षक म्हणून हवे आहात. आजही अनेक गुरुजी विद्यार्थ्यांसाठी जगत आहेत. रमेश पानसे यांनी ग्रामीण भागात जाऊन ग्राम मंगल ऐना येथे कायापालट केला आहे. वारे गुरुजींनी जागतिक पातळीवरची चांगली प्रथम क्रमांकाची शाळा निर्माण केली आहे. अनेक गुरुजींनी आज स्वतःला सिद्ध केलं आहे. बदली झाल्यावर अनेक विद्यार्थ्यांच्या व समाजाच्या डोळ्यांत अश्रूंची फुले आणणारे गुरुजी आजही आहेत. शून्यातून विश्व निर्माण करणारे गुरुजी आजही आहेत.
डॉ.अनिल कुलकर्णी






























































