भयमुक्त ठाण्यासाठी आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली उद्या महाआंदोलन, प्रदीप पूर्णेकर यांच्या न्यायासाठी पोलीस आयुक्तांना भेटणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

प्रदीप पूर्णेकरांना न्याय द्या, सूत्रधारांना अटक करा, एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या आणि ठाणे भयमुक्त करा या मागण्यांसाठी गुरुवारी शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली ठाण्यात सर्वपक्षीयांचे महाआंदोलन होणार आहे. जांभळी नाका येथील चिंतामणी चौकात सायंकाळी पाच वाजता हे महाआंदोलन होणार असून यावेळी शिवसेना नेते, खासदार संजय राऊत हेही उपस्थित राहणार आहेत. ठाणे हे क्राईम कॅपिटल झाले आहे. ड्रगमाफिया आणि गुन्हेगारीचा विळखा पडलेले ठाणे भयमुक्त करा असा नारा या आंदोलनात बुलंद करण्यात येणार आहे. यावेळी आदित्य ठाकरे पूर्णेकर कुफटुंबियांशी चर्चा करणार असून त्यानंतर ठाण्याच्या पोलीस आयुक्तांचीही भेट घेणार आहेत.

मीनाक्षी शिंदे यांची चौकशी

मीनाक्षी शिंदे यांची आज विशेष तपास पथकाने सुमारे सात तास चौकशी केली. त्यांना रात्री आठच्या सुमारास सोडण्यात आले. या चौकशीदरम्यान त्यांना पूर्णेकर यांच्याशी असलेले वैमनस्य, हत्येच्या दिवशी त्यांचे लोकेशन काय होते, घटनेची त्यांना पूर्वकल्पना होती का? आणि या प्रकरणातील आरोपींना त्या कधीपासून आणि कशा ओळखतात याबाबत प्रश्न विचारण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

माझे वडील गेलेत हो सर… तुम्ही चुकीचे करताय!

मी आंदोलनाची परवानगी घेतली असतानाही मला का रोखता? माझे वडील गेलेत हो सर… मला न्याय हवा आहे… तुम्ही चुकीचे करताय, असा आक्रोश राम याने केला. मात्र, पोलिसांनी त्याचे ऐकले नाही. आमच्यावर विश्वास ठेव, असे सांगत पोलिसांनी त्याला जबरदस्ती रिक्षात बसवले आणि नौपाडा पोलीस ठाण्यात नेण्यात आले. दरम्यान, एकनाथ शिंदे यांच्या घराबाहेर आंदोलन करण्याचा इशारा पूर्णेकर कुटुंबीयांनी दिल्यानंतर सोमवारपासूनच शिंदे यांच्या घराजवळ पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.