
दक्षिण मुंबईतील काही शाळा तसेच शाळांमधील अनेक वर्ग आवश्यक परवानगीशिवाय सुरू असल्याचे उघड झाले आहे. या पार्श्वभूमीवर दक्षिण मुंबईतील संबंधित शैक्षणिक संस्थांना नोटिसा बजावण्यात आल्या असून अनधिकृतपणे सुरू असलेल्या शाळा आणि वर्ग तत्काळ बंद करण्याचे निर्देश शिक्षण निरीक्षकांनी दिले आहेत.
शिक्षण विभागाच्या तपासणीत दक्षिण मुंबईतील काही इंग्रजी माध्यमाच्या शाळा कोणतीही परवानगी नसताना सुरू असल्याचे निदर्शनास आले. या शाळांना कोणत्याही वर्गासाठी मान्यता नसल्याचे शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे. याशिवाय काही शाळांमध्ये मर्यादित वर्गांना मान्यता असताना त्यापेक्षा अधिक वर्ग बेकायदेशीरपणे चालविले जात असल्याचेही आढळून आले आहे. त्यात मस्जिद परिसरातील मोहम्मदीया हायस्कूलमध्ये व परळमधील गोल्डन स्पायरल हायस्कूलमध्ये काही वर्ग अनधिकृतरीत्या सुरू असल्याचे शिक्षण विभागाच्या तपासणीत आढळले.
सरकारची मान्यता तपासून प्रवेश घ्यावा
शिक्षण निरीक्षकांनी जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात विद्यार्थी आणि पालकांनी प्रवेश घेताना शाळेची शासकीय मान्यता तपासूनच निर्णय घ्यावा, असे आवाहन शिक्षण विभागाने केले आहे.




























































